Women Misusing Anti Rape Law: हल्ली महिला आपल्या जोडीदाराबरोबर मतभेद झाल्यानंतर बलात्कारासंदर्भातील कायद्याचा दुरुपयोग करुन त्याचा हत्यारासारखा वापर करतात असं निरीक्षण उत्तराखंड उच्च न्यायालयाने (Uttarakhand High Court) नोंदवलं आहे. न्यायमूर्ती शरद कुमार शर्मा यांनी 5 जुलै रोजी एका व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्हेकारी स्वरुपाच्या कारवाईला रद्द करण्याचे आदेश देताना हे विधान केलं आहे. या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तीने महिलेबरोबर लग्न करण्यास नकार दिल्याने तिने बलात्काराच्या गुन्ह्याखाली या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. 2005 मध्ये दोघांनीही संमतीने शरीरसंबंध ठेवले होते.
सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा असा उल्लेख केला आहे की जर दोघांपैकी कोणत्याही एका पक्षाने लग्नाला नकार दिला तर दोन सज्ञान व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने प्रस्थापित झालेल्या शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही, असं निरीक्षण न्यायमूर्ती शर्मा यांनी नोंदवलं. महिला वादाबरोबरच वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या पुरुष जोडीदाराविरोधात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसीच्या) कलम 376 चा दुरुपयोग करत आहेत, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
न्यायालयाने ज्या प्रकरणामध्ये हे निरीक्षण नोंदवलं त्यामधील तक्रारदार महिलेने 30 जून 2020 रोजी आपल्या पुरुष जोडीदाराविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये संबंधित महिलेने आरोपीने 2005 साली परस्पर संमतीने आपल्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले होते. त्यावेळी दोघांपैकी कोणालाही नोकरी लागली की लगेच लग्न करण्याचं आश्वासन या दोघांनी एकमेकांना दिलं होतं. मात्र नंतर या पुरुषाने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. मात्र त्यानंतरही हे दोघे परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवत होते, असा तपशील तक्रारीत देण्यात आला होता.
"आपण ज्याच्याबरोबर संबंध ठेवत आहोत त्याचं लग्न झालेलं आहे याची कल्पना या महिलेला होती. तरीही तिने स्वइच्छेने त्याच्याबरोबर नातं कायम ठेवलं. अशा प्रकरणामध्ये तिची संमतही होती असं समजलं जातं," असं न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना म्हटलं. परस्पर संमतीने एखाद्या नात्याला सुरुवात करताना लग्नासंदर्भातील आश्वासनामधील सतत्या नात्याला सुरुवात करण्याआधीच तपासून पाहिली पाहिजे. ही सतत्या नातं सुरु झाल्यानंतर तपासणं चुकीचं ठरतं, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. 15 वर्ष हे नातं सुरु होतं अशावेळेस याला नातं नवीन आहे असं म्हणता येणार नाही. या पुरुषाच्या लग्नानंतरही दोघांमध्ये नातं कायम होतं, असं म्हणत न्यायालयाने परस्पर संमतीनेच हे संबंध ठेवण्यात आल्याचं म्हटलं.