मास्क घालण्याबाबत WHOच्या गाईडलाईन्समध्ये बदल

कोरोना संसर्ग वाढत असताना WHOने मास्क घालण्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Updated: Jun 6, 2020, 04:40 PM IST
मास्क घालण्याबाबत WHOच्या गाईडलाईन्समध्ये बदल
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी कोरोना व्हायरससंबंधी फेसमास्क घालण्याबाबत काही गाईडलाईन्स अपडेट केल्या आहेत. गाईडलाईन्स अपडेट करत WHOने सांगितलं की, जेथे कोरोना व्हायरस नव्याने पसरला आहे, पसरत आहे, तिथे गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालणं आवश्यक आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना WHOने मास्क घालण्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

WHOचे प्रमुख टेड्रोस अदनॉम यांनी सांगितलं की, ज्या ठिकाणी कोरोना संक्रमणाचा अधिक धोका आहे अशा ठिकाणी मास्क घालण्यास सर्व सरकारनी आपल्या लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे. तसंच सार्वजनिक वाहतूक, दुकानं किंवा इतर अशा ठिकाणी जेथे गर्दीचं वातावरण आहे, किंवा लोकांना एकमेकांपासून अंतर राखणं कठिण असेल अशा ठिकाणी मास्क वापरणं अत्यावश्क आहे.

WHOकडून कम्युनिटी ट्रान्समिशन भागांसाठीही काही गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. जे लोक 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, ज्या लोकांना गंभीर आजार आहेत अशा लोकांनी मेडिकल मास्क घालणं आवश्यक आहे. मेडिकल मास्क न घालणाऱ्यांसाठी, फॅब्रिक मास्कबाबतही WHOने सांगितलं की, वेगवेगळ्या मटेरियलमधील मास्कला किमान तीन थर असावेत.

कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी मास्क घालणं हा एक केवळ प्रभावी भाग आहे. मास्क घातल्याने कोरोना संसर्गापासून लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत असं समजू नये, असंही WHOने सांगितलं आहे.