Yogi Government Action Against Police Station: उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये घडलेल्या एका विचित्र प्रकारामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. गुडघाभर पाण्यातून जाणाऱ्या बाईकवरील महिलेची छेड काढण्यात आल्याचा व्हिडीओ देशभरामध्ये व्हायर झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच राज्य सरकारने स्थानिक पोलीस आयुक्त (DCP), अतिरिक्त पोलीस आयुक्त (ADCP), सहाय्यक पोलीस उपायुक्त (ACP) या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. तसेच स्थानिक पोलीस स्टेशनमधील प्रभारी निरीक्षक, पोलीस स्थानकाचे प्रमुखांना निलंबित करण्यात आलं आहे. एवढ्यावरच न थांबता सदर घटना ज्या पोलीस स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या भागात घडली त्या गोमती नगर पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली तेव्हा ऑन ड्युटी असलेल्या असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
यापूर्वी पोलिसांच्या चार वेगवेगळ्या तुकड्या तयार करुन या हुल्लडबाजांना शोधण्यासाठी तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे महिलेची छेडछाड करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
लखनऊमध्ये बुधवारी जोरदार पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं. त्यातही ताज हॉटेलच्या ब्रिजसमोर तरुणांचं एक टोळकं लोकांना त्रास देत होते. पाऊस सुरु असताना आणि पाणी साचलेलं असताना स्थानिकांना हा त्रास सहन करावा लागला. हे तरुण येणाऱ्या जाणाऱ्या तरुण मुली, महिला, वयस्कर लोकांना धक्काबुक्की करत होते. दुचाकीवरुन जाणाऱ्यांवर पाणी उडवणे, दुचाक्यांना धक्का देणे, कारची दारं उघडून आत पाणी टाकणे असे प्रकार हे लोक करत होते.
एका जोडप्याची बाईक अडवून या लोकांनी मागे बसलेल्या महिलेला पाण्यात पाडून तिची छेड काढली. सुरुवातीला हे दोघे बाईकवरुन जात असतानाच त्यांच्यावर या तरुणांनी पाणी उडवलं. नंतर दुचाकी पकडून धरली. त्यानंतर मागे बसलेल्या महिलेला मागून खाली खेचत पाण्यात पाडलं. ही दुचाकीही पाण्यात पडली. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे.
Lucknow: A viral video shows people mistreating a woman during rain and causing a ruckus under the Taj Hotel bridge. Police intervened, dispersed the crowd, and are identifying those involved pic.twitter.com/7TJxUYKmIv
— IANS (@ians_india) July 31, 2024
समोर आलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडताना हाताच्या अंतरावर पोलीस उभे होते. तरी मस्करी सुरु असल्याचं समजून त्यांनी हस्तक्षेप केला नाही असं काहींचं म्हणणं आहे.