झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी आपल्याला गुरुवारी आपल्याला मॉलमध्ये जाण्यापासून रोखलं असा दावा केला आहे. दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) डिलिव्हरी एजंटच्या भूमिकेत मॉलमध्ये पोहोचले होते. त्यांना फूड ऑर्डर पिक करायची होती. दीपिंदर गोयल यांनी डिलिव्हरी एजंट्ससमोर येणारी आव्हानं जाणून घेण्यासाठी स्वत: एजंटची भूमिका साकारली. ते आपली पत्नी ग्रेसियासह डिलिव्हरी पार्टनर बनून मॉलमध्ये पोहोचले होते. यावेळी अॅम्बियन्स मॉलमध्ये ते ऑर्डर घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना प्रवेश नाकारत लिफ्टऐवजी पायऱ्यांवरुन जाण्यास सांगण्यात आलं.
"माझ्या दुसऱ्या ऑर्डरदरम्यान लक्षात आलं की डिलिव्हरी पार्टनर्ससाठी कामाची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्हाला मॉल्सशी अधिक जवळून काम करण्याची आवश्यकता आहे. मॉल्सने देखील डिलिव्हरी पार्टनर्सना योग्य वागणूक देण्यची गरज आहे," असं त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. व्हिडीओत दीपिंदर गोयल यांनी झोमॅटो डिलिव्हरी एजंटचे कपडे घातल्याचं दिसत आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, "आम्ही गुरुग्राममधील अॅम्बिअन्स मॉलमध्ये हळदीरामकडून ऑर्डर पिक करण्यासाठी पोहोचलो होतो. मला दुसऱ्या प्रवेशद्वारातून जाण्यास सांगण्यात आलं. नंतर माझ्या लक्षात आलं की, ते पायऱ्यांनी जाण्यास सांगत आहेत. डिलिव्हरी पार्टनर्ससाठी कोणतेही एलिव्हेटर नाहीत का हे तपासण्यासाठी मी पुन्हा आत जाऊन एकदा विचारलं".
During my second order, I realised that we need to work with malls more closely to improve working conditions for all delivery partners. And malls also need to be more humane to delivery partners.
What do you think? pic.twitter.com/vgccgyH8oE
— Deepinder Goyal (@deepigoyal) October 6, 2024
दीपिंदर गोयल यांनी केलेल्या दाव्यानुसार, ते तिसऱ्या माळ्यापर्यंत चालत गेले. यावेळी त्यांना समजलं की, डिलिव्हरी पार्टनर मॉलमध्ये प्रवेश करु शकत नाहीत आणि ऑर्डर घेण्यासाठी पायऱ्यांवरच वाट पाहत बसावं लागतं.
"माझ्या सहकारी डिलिव्हरी पार्टनर्ससह चांगला वेळ घालवला. यावेळी त्यांच्याकडून मौल्यवान असा अभिप्रायदेखील घेतला. पायऱ्यांवरील सुरक्षारक्षकाने छोटा ब्रेक घेतल्यानंतर मला ऑर्डर मिळवण्यासाठी प्रवेश करण्याची संधी मिळाली," असंही त्यांनी सांगितलं आहे.
त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. केवळ मॉल्सच नाही तर विविध सोसायट्या देखील डिलिव्हरी एजंट्सना मुख्य लिफ्टमधून प्रवास करण्याची परवानगी देत नाहीत असं काहींनी सांगितलं आहे. "प्रत्येक सोसायटी, प्रत्येक मॉल आणि प्रत्येक कार्यालयाने डिलिव्हरी एजंट्सना सामान्य नियमित लिफ्ट वापरण्यास दिली पाहिजे. यात कोणतंही विभाजन असू नये," असं एका युजरने सांगितलं.