close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; 'हा' नेता शिवसेनेच्या गोटात

विजयराज खुळे हे मूळचे शिवसैनिक असून राज्यातील शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत.

Updated: Sep 16, 2019, 09:57 AM IST
राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; 'हा' नेता शिवसेनेच्या गोटात

रायगड: राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. यामध्ये आता रायगड जिल्ह्यातील विजयराज खुळे यांची भर पडली आहे. विजयराज खुळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते आहेत. ते आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील. 

काही दिवसांपूर्वीच सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे, भाऊ अनिल तटकरे तसेच जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांना जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.  

विजयराज खुळे हे मूळचे शिवसैनिक असून राज्यातील शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. ते दक्षिण रायगडातील बडे राजकीय प्रस्थ असून जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. यानंतर भाजप आणि शिवसेनेकडून नेत्यांची घाऊक आयात सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला होता. यामध्ये उदयनराजे भोसले जगजितसिंह राणा, सचिन अहिर, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड आणि भास्कर जाधव यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी शिवसेना आणि भाजपचा रस्ता धरला होता. 

काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे ११ गड ढासळण्याच्या स्थितीत

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर कितपत आव्हान निर्माण करू शकेल, याबाबत शंकाच आहे. दरम्यान, आता पक्षाला उभारी देण्यासाठी शरद पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत. 

राष्ट्रवादीला पुण्यात पुन्हा झटका, आणखी एक नेता भाजपमध्ये