चांगली झोप ही शरीरासाठी आणि मेंदूसाठी खूप आवश्यक असते. रात्रीची जर चांगली झोप मिळाली तर दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहता, तसेच आरोग्य सुद्धा चांगले राहते. अनेकदा काही चुकांमुळे तुमची झोप खराब होते ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तेव्हा रात्री झोपताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत जाणून घेऊयात.
मोबाईलचा वापर : आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांकडेच स्मार्ट फोन आहेत. सोशल मीडियामुळे मोबाईलचा वापर वाढला असून झोपताना सुद्धा अनेकजण मोबाईल जवळ घेऊन झोपतात. तर काहीजण झोप आलेली असताना अतिरिक्त ताण देऊन मोबाईल पाहतात. यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तसेच डोकेदुखीची समस्या जाणवू शकते.
रात्री जास्त जेवू नये : रात्री झोपण्यापूर्वी भरपूर जेवू नये, यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. यामुळे झोप येण्यामध्ये सुद्धा अडचणी येतात. झोपमोड झाल्याने ऍसिडिटीची समस्या होते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास अगोदर जेवण करायला हवं, यामुळे झोपेत अडचण निर्माण होत नाही.
हेही वाचा : शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर दिसतात 5 लक्षण, इग्नोर केल्यास वाढेल हार्ट अटॅकचा धोका
कॅफिन आणि अल्कोहोलचं सेवन : कॅफिन आणि अल्कोहोल इत्यादी दोन्हीमुळे झोपेवर प्रभाव पडतो. कॅफिन हा असा पदार्थ आहे जो झोपेला प्रभावित करतो. दारूमुळे सुरुवातीला झोप येते, मात्र नंतर सारखी जाग येऊन झोपमोड होऊ शकते.
स्ट्रेस : अतिरिक्त ताणतणावामुळे झोप बाधित होते. तणावामुळे झोप न लागणे, चिंता डिप्रेशन इत्यादी समस्या उद्भवू शकतात. म्हणून तुम्ही झोपण्यापूर्वी मेडिटेशन केल्यास तणाव कमी होऊ शकतो.
अनियमित झोप : दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठण्याची सवय लावणं अतिशय महत्वाचं ठरतं. अनियमित झोपमुळे आपल्या शरीराचं चक्र बिघडतं ज्यामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते.
खोलीचं तापमान उष्ण असणे : तुम्ही ज्या खोलीमध्ये झोपणार आहात त्या खोलीचं तापमान हे जर जास्त असेल तर नीट झोप लागत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या खोलीत झोपणार आहात त्याच तापमान हे 18-20 डिग्री सेल्सियस असायला हवं.