मुलांवर लहानपणापासूनच संस्कार करणे आवश्यक असते. आता पालक दोघेही मिळून मुलांच्या भविष्याचा विचार करतात. असे असले तरीही, मुलांवर संस्कार करण्यामध्ये आईची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.
कारण मुलं ही अतिशय साधी असतात. आपल्या पालकांना आणि खास करुन आईला पाहत ते नवं काही शिकत असतात. म्हणून आई ही मुलांची पहिली शिक्षिका, गुरु असल्याचं म्हटलं जातं. मुलांवर संस्कार करत असताना अनेकदा आईला कठोर व्हावं लागतं. कठोर आणि मुलांना न पटणारे निर्णय देखील घ्यावे लागतात. अशावेळी आईमध्ये एक अपराधीपणाची भावना असते. सतत आईला आपण मुलांशी कठोर वागत असल्याची एक अपराधी भावना असते. या सगळ्यावर श्री श्री रवि शंकर यांनी आईशी याबाबत संवाद साधला आहे.
श्री श्री रवि शंकर यांना एका मुलाखतीत आईने प्रश्न विचारला की, मी अनेकदा मुलांवर ओरडते. शिस्त लावताना त्यांच्यावर चिडते तेव्हा एक अपराधी भावना असते. यावर मी काय करु?
श्री श्री रवि शंकर म्हणाले, काहीच हरकत नाही. मुलांवर संस्कार करताना त्यांना शिस्त लावताना आईला ओरडावंच लागणार. आई नाही ओरडणार तर कोण ओरडणार? आईच्या ओरडण्यामागे मुलांचे चांगलेच व्हावे हा हेतू असतो. त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी दोघांनीही ही भावना मनातून काढून टाकायला हवी.
अनेकदा पालक मुलांशी अतिशय प्रेमाने आणि कोणताही विरोध न करता वागतात. पण हे वागणं योग्य नाही. कारण यामुळे मुलांना विरोध म्हणजे काय हे समजत नाही. मुलं जगही आपल्याशी असंच वागेल या भ्रमात राहतात. अनेकदा पालक मुलांना जे आपल्याला मिळत नाही ते देण्यावर अधिक भर असतो. पण पालकांनी मुलांना काही वेळा गोष्टी न मिळण्याचा किंवा उशीरा मिळण्याचा अनुभव देखील द्यायला हवा.
आई आणि मुलांचं नातं कायमच खास असतं. अशावेळी आईने मुलांना ओरडणं खूप महत्त्वाचं असतं. हे ओरडणं व्हॅक्सिनप्रमाणे काम करतं. कारण बाहेरच्या जगात मुलांना चांगलाच अनुभव येईल असं नाही. त्यामुळे या कटू आणि कठोर वागण्याला मुलांनी सामोरं जाणं गरजेचं आहे.