पुणे : 100 crores demand from MLA to get cabinet minister post : आता एक धक्कादायक बातमी. राज्य सरकार मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची ऑफर चक्क एका आमदाराला देण्यात आली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील आमदाराकडे 100 कोटींची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे नवे सरकार (Maharashtra Political Crisis) स्थापन झाले, नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे कोणाच्या नावाचा समावेश होणार, कोणाला मिळणार मंत्रिपद? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एका आमदाराकडून कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे.
राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अनेक आमदार मंत्रिपद मिळविण्यासाठी नंदनवन (एकनाथ शिंदे यांचा बंगला) आणि सागर (देवेंद्र फडणवीस यांचा बंगला) येथे चकरा मारताना दिसत आहेत. याचा फायदा घेत चार जणांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
पुण्यातील आमदाराकडे 100 कोटींची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैशांची मागणी करण्यासाठी आरोपी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदाराला भेटले. मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्रिमंडळात मंत्री पद देण्यासाठी 100 कोटी मागितल्याचं सांगितले. त्यानंतर 17 जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदाराची भेट घेतली. त्यावेळी मंत्रिमंडळात सहभागासाठी 90 कोटी रुपये मागत असून त्यातील 20 टक्के रक्कम उद्या द्यावे लागतील, असे सांगितले.
पैसे घेण्यासाठी आमदाराने आरोपींना मुंबईतील ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले. तिथे पोलिसांनी रियाजला ताब्यात घेत चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक केली. आरोपीने अशा पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक केलीय का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.