यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवावर उठली असून आतापर्यंत एकूण १९ जणांचा यात मृत्यू झालाय. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळं पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळलंय.

Updated: Oct 4, 2017, 07:40 PM IST
यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू  title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवावर उठली असून आतापर्यंत एकूण १९ जणांचा यात मृत्यू झालाय. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळं पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळलंय.

यवतमाळ जिल्ह्याच्या सावरगावील फुलमाळी कुटुंबावर शोककळा पसरलीय. कारण या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालाय. गजानन फुलमाळी यांचा औषध फवारणीनं घात केलाय. पिकावर  औषध फवारणी करत असताना त्यांना विषबाधा झाली होती. पतीच्या निधनानंतर तीन मुलांचं पोटं कसं भरायचं? असा प्रश्न गजानन यांची पत्नी संगिता फुलमाळी यांना पडलाय. 

फुलमाळी कुटुंबाला तीन एकर शेती असून पावसानं ओढ दिल्यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिक वाचवण्यासाठी गजानन फुलमाळी यांनी औषध फवारणी केली. दिवसभर फवारणी केल्यानंतर संध्याकाळी  गजानन यांना त्रास होऊ लागला... आणि त्यातच त्यांना जीव गमवावा लागला. औषध फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा होते. हे विष रुग्णाच्या नव्हर्स सेलमध्ये जमा होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

औषध फवारणी दरम्यान विषबाधा होण्याच्या घटना गेल्या वर्षीही यवतमाळ जिल्ह्यात घडल्या होत्या. गेल्या वर्षी १७० लोकांना फवारणी दरम्यान विषबाधा झाली होती. त्यापैंकी सहा जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीचं सरकारने याची गांभिर्याने दखल घेतली असती तर यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा हकनाक बळी गेला नसता. पण निर्ढावलेल्या सरकारी यंत्रणेच्या लेखी शेतकऱ्याला किती किंमत आहे, हे या प्रकणातून पुन्हा एकदा समोर आलं आहे.