तरुणीला घराबाहेर बोलवले अन् अंगणातच तिची हत्या केली; वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून घडला थरार

Crime News In Marathi: वर्ध्यात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. तरुणीला घराच्या बाहेर बोलवून तिची हत्या करण्यात आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 3, 2023, 11:28 AM IST
तरुणीला घराबाहेर बोलवले अन् अंगणातच तिची हत्या केली; वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून घडला थरार title=
24 years old Girl killed in one sided love affair in wardha news

मिलिंद अंडे, झी मीडिया

Crime News In Marathi: वर्ध्याच्या दहेगाव गोसावी येथे रात्री युवतीची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे युवतीला घराबाहेर बोलवून तिच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना ताब्यात घेतलं आहे. तर, हत्येच्या घटनेमुळे दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

एकतर्फी प्रेमातून हत्या 

वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे 23 वर्षीय युवती घरी असताना तिला घराच्या बाहेर बोलावून हत्या करण्यात आली आहे. या थरारक घटनेने दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. 

अंगणात बोलवून केले वार 

वर्ध्यातुन दोन तरुण दहेगाव गोसावी येथे सोबत पोहोचले होते. त्यांच्यासोबत दोन मुलीदेखील होत्या. तरुणांनी दोन मुलींना घराच्या गेटजवळून युवतीला हाक द्यायला लावलीय. रात्रीला युवती घराबाहेर अंगणात येताच मागून आलेल्या युवकांनी चाकूने तिच्या गळ्यावर सपास वार केलेय. 

जखमी अवस्थेत रुग्णालयात केले दाखल पण... 

युवतीने आरडाओरडा करताच घरातील सदस्य घराबाहेर आले. तेव्हा युवती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे. चाकूने वार करुन पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींचा गावकऱ्यांनी पाठलाग करत पकडले आहे. 

गावात वातावरण तापलं

गावकऱ्यांनी चौघांनाही पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. दहेगाव गोसावी येथे या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. दहेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले होते. या थरारक घटनेमुळे गावकाऱ्यांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. यापूर्वी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे प्राध्यापिका जळीत प्रकरण घडले होते. त्यामुळं राज्यभरात खळबळ माजली होती. या घटनेमुळे देखील आता महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत खळबळ निर्माण झाली आहे.