रवींद्र कांबळे, सांगली : राज्यातील मुस्लिम नागरिकांनी शुक्रवारचं नमाज पठण कोरोनामुळे घरातच केलं, पण मिरजेत आदेश मोडून मशिदीत नमाज पठणासाठी जमलेल्या ३६ मुस्लिमांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.
दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्ग्यात मरकज या धार्मिक कार्यक्रमानिमित्त हजारो मुस्लीम एकत्र आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून देशाच्या वेगवेगळ्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे जमावबंदी आणि सोशल डिस्टसिंग याबाबत काटेकोर अंमलबजावणीची गरज आहे. असे असताना शुक्रवारी मिरज येथील मटण मार्केटजवळील बरकत मशिदीत ३६ हून अधिक मुस्लीम नमाज पठणासाठी जमले होते. त्याची माहिती मिरज पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिथं जमलेल्या लोकांना ताब्यात घेतले. या नमाज पठणात एक बिहारी मुलगाही सहभागी झाला होता. पोलीस येताच १० जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना पकडले. आपत्ती व्यवस्थापन कायद्याची पायमल्ली करून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारे कृत्य केल्याबद्दल पोलिसांनी २६ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मंदिर, मशिदीसह सर्वच धर्मस्थळांमधील धार्मिक विधी बंद करण्यात आले आहेत. त्यातच निजामुद्दीनच्या कार्यक्रमामुळे कोरोना देशभरात कसा पसरला हेदेखिल पुढे आले आहे. कोरोना रोखण्याचे आव्हान वाढले असताना सर्वच धर्मियांनी सरकारच्या आवाहनाला आणि आदेशाला पाठिंबाही दिला आहे. सांगली, मिरजमधील अन्य मिशिदीही आज बंदच होत्या. बरकद मशिदीतही मौलाना उपस्थित नव्हते. मात्र काही जणांनी तिथे नमाज पठणासाठी जमले. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागली. मुंबईसह अन्य भागात मुस्लिमांनी शुक्रवारचं नमाज पठण आज घरातच केलं.