मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवारांच्या भेटीला, म्हणाला 'होय, मी त्यांचा कार्यकर्ता! पण...'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सभेत गोंधळ घालणारा तरुण किरण सानपने (Kiran Sanap) शरद पवारांची भेट घेतली आहे. किरण सानपने कांद्यावर बोला असं म्हणत नरेंद्र मोदींच्या सभेत घोषणा दिली होती.   

शिवराज यादव | Updated: May 17, 2024, 10:14 AM IST
मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवारांच्या भेटीला, म्हणाला 'होय, मी त्यांचा कार्यकर्ता! पण...' title=

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सभेत गोंधळ घालणारा तरुण किरण सानपने (Kiran Sanap) शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवार नाशिकच्या एमराल्ड पार्क हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. येथे जाऊन किरण सानपने शरद पवारांची भेट घेतली. किरण सानपने नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथील सभेत कांद्यावर बोला म्हणून घोषणाबाजी केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने शरद पवारांची भेट घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने आपण शरद पवारांचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं आहे. तसंच आपण सभेत त्यांचे कार्यकर्ते म्हणून गेलो नव्हतो असं स्पष्टीकरणही दिलं आहे. 

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर किरण सानपने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितलं की, "कालच्या सभेत शरद पवारांनी जर तो माझा कार्यकर्ता असेल तर अभिमान आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे मी आज त्यांच्या भेटीसाठी आलो. त्यांनी माझी विचारपूस केली आहे. पोलीस स्टेसनमध्ये काही त्रास झाला का अशी विचारणाही त्यांनी केली. तसंच भावी वाटचीलासाठी शुभेच्छा दिल्या".

"आमचा निफाड तालुका कांद्याची पंढरी आहे. पंतप्रधान येथे आल्यानंतर  कांद्यावर बोलण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण करणारी विधानं केली. मी 15 मिनिटं त्यांची वाट पाहली. पण ते बोलत नव्हते आणि पुढेही बोलतील असं जाणवत नव्हतं. अखेर न राहिल्याने मी कांद्यावर बोला अशी घोषणा दिली," अशी माहिती त्याने दिली आहे. 

पुढे त्याने सांगितलं की, "मी तिथे एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो होतो. मी शरद पवार किंवा कोणत्याही पक्षाच्या नावे घोषणा दिल्या नाहीत". मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे असंही यावेळी त्याने मान्य केलं. "मी शरद पवारांचा कार्यकर्ता असून, कार्यरत आहे. मी शरद पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तिथे असतो तर शरद पवारांच्या नावे घोषणा दिल्या असत्या. पण तसं काही झालं नाही". 

पोलिसांना मला ताब्यात घेतल्यानंतर मोबाईल जप्त करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी माझी सुटका कऱण्यात आली. मला जामीन मंजूर झाली आहे अशी माहितीही त्याने दिली. 

शरद पवारांनी सभेत केलं होतं जाहीर कौतुक

"मोदींना कांद्यावर बोला असे तरुण शेतकर्‍यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही. मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे," असं जाहीर कौतुक शरद पवारांनी केलं होतं.