Vasai Accident News : मृत्यू कुणाला कधी कुठे गाठेल याचा काही नेम नाही. औरंगाबाद येथे राहणाऱ्या तरुणाचा वसईत दुर्दैवी अंत झाला आहे. कुणी कल्पनाही करु शकत नाही असा भयानक मृत्यू या तरुणाचा झाला आहे. समुद्र किनाऱ्यावर या मुलाला मृत्यूने गाठले आहे. मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियावर दुखा:चा डोगर कोसळला आहे.
समुद्र किनारी क्रिकेट खेळत असताना समुद्रात गेलेला बॉल आणण्याच्या नादात एका 17 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. धक्कादायक घटना वसईच्या भुईगांव समुद्र किनारी घडली आहे. साहिल त्रिभुवन असं या तरुणाचे नाव असून तो मूळ औरंगाबाद येथील राहणारा आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तो वसईतील वाघोली येथे राहणाऱ्या मावशीकडे आला होता. बरेच दिवस मावशीकडे राहिल्यानंतर आज रात्री तो औरंगाबाद येथे परतीच्या प्रवासासाठी निघणार होता.
समुद्र पाहिला नसल्याने शनिवारी संध्याकाळी तो आपल्या मावस भावंडांसह वसईच्या भुईगाव किनाऱ्यावर गेला होता. यावेळी तो आपल्या भावंडांसोबत क्रिकेट खेळत असतान ही दुर्घटना घडली. क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू समुद्रात गेल्याने साहिलचा भाऊ जेर्मिक कजार हा तो आणण्यासाठी गेला असताना तो बुडू लागला. यामुळे साहिल त्याला वाचविण्यासाठी समुद्रात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो स्वतःच बुडाला.
याची माहिती वसई सागरी पोलिस व पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ शोध कार्य सुरु केले. रात्री उशिरा पर्यंत त्यांना साहिलचा मृतदेह सापडलेला नाही. समुद्र किनाऱ्यावर मौज मजा करण्यापासून ते मृत्यू पर्यंतचा साहिलचा प्रवास काळजाचा ठोका चुकविणारा आहे.