सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : बहिणीला त्रास देणाऱ्या एक तरुणाचा भावाने कायमचाच बंदोबस्त केला आहे. नाशिक शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून बहिणीला त्रास देऊन लग्नासाठी तगादा लावत असल्याच्या रागातून तरुणीच्या भावाने 25 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे (Nashik Crime).
नाशिक शहरातील निलगिरी बाग येथील आडगाव परिसरात ही हत्या घडली आहे. विकास रमेश नलावडे असे मृत तरुणाचे नाव आहे. विकास निलगिरी बाग परिसरात राहत होता. विकास राहत असलेल्या परिसारतील एका तरुणीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. त्याला सदर तरुणीसोबत लग्न करायचे होते त्यामुळे विकासने सदर तरुणीकडे सतत लग्नासाठी तगादा लावला होता. तर, संशयित आरोपींनी मयत विकास याला अनेकदा समजावण्याचा देखील प्रयत्न केला होता. तरी देखील विकास याने मुलीच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता.
मुलीच्या भावाला या गोष्टीचा राग आल्याने 22 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास निलगिरी बाग परिसरातील बिल्डिंग नंबर 5 समोर असलेल्या मोकळ्या जागेत,संशयित आरोपी याने "तू माझ्या बहिणीशी लग्न करायचे असे का बोलतो" या कारणावरून कुरापत काढून विकास रमेश नलावडे यास संशयित अमोल साळवे आणि त्याच्या दोन साथीदार यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेतील मुख्य संशयित आरोपी अमोल साळवे याने धारदार शस्त्राने विकास याच्या पोटात आणि डोक्यात जबर वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने विकास याचा मृत्यू झाला. या गुन्हामध्ये गुन्हे शोध पथक यांनी मुख्य संशयित अमोल वसंत साळवे याला ताब्यात घेतले.
आरोपीकडे इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्यासोबत त्याचा मामा संशयित सुनील मोरे व त्याचा दाजी संशयित राहुल भीमराव उजगीरे याची नावे सांगितले त्यानुसार गुन्हे शोध पथकाने संशयित सुनील मोरे यास ताब्यात घेतले असून घटनेतील तिसरा संशयित आरोपी राहुल उजागिरे हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती नाशिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे.