काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात 'आप'ची एंट्री, ग्रामपंचायत निवडणुकीत पाच उमेदवार विजयी

 लातूर (Latur) या जिल्ह्यात काँग्रेसचे (Congress) वर्चस्व आहे.  या ठिकाणी आम आदमी ( Aam Aadmi Party) पक्षाने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्तास्थापन केली आहे. 

Updated: Jan 19, 2021, 08:02 AM IST
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात 'आप'ची एंट्री, ग्रामपंचायत निवडणुकीत पाच उमेदवार विजयी  title=
Pic Courtesy : twitter

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १२ हजार ७११ जागांसाठी मतमोजणी झाली. मात्र यात कोणत्या पक्षाने वर्चस्व मिळवले याबाबत गोंधळाची स्थिती आहे. दरम्यान, लातूर या जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व आहे. लातूर आणि लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र, या ठिकाणी आम आदमी पक्षाने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्तास्थापन केली आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात  'आप'ची एंट्री झाली आहे.

लातूरच्या दापक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे लक्ष लागले आहे. याबाबत दिल्लीची मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसवा अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी आपचे अजिंक्य शिंदे यांचे ट्विट रिट्विट करत थेट मराठीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, “विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा”.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या सर्वच पक्ष आपण आघाडीवर असल्याचा दावा करत आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेते किती जागांवर विजय मिळवला यावरुन दावे करत असताना आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १२ हजार ७११ जागांसाठी मतमोजणी झाली. मात्र यात कोणत्या पक्षाने वर्चस्व मिळवले याबाबत गोंधळाची स्थिती आहे.  कारण भाजपने सर्वाधिक यश मिळवल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याबाबत सध्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी यश मिळवले असून सर्वच पक्षांनी या आघाड्यांवर आपला दावा केला असल्याचंही समोर येत आहे.