सोलापूरमागोमाग मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर

अतिवृष्टीग्रस्त भागाला देणार भेट....   

Updated: Oct 21, 2020, 09:20 AM IST
सोलापूरमागोमाग मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर बहुतांश भागांमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि इतरही राजकीय मंडळींनी मराठवाडा आणि इतर भागांचा दौरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनीही सोलापूर, उस्मानाबाद भागाचा दौरा करत या भागातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी केली. 

अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. शिवाय बळीराजाला मदतीचं आश्वासनही दिलं. सोलापूर आणि उस्मानाबाद येथील पाहणी दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री लवकरच कोकणचा दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

 

उद्धव ठाकरे या दौऱ्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड जिल्ह्याला भेट देणार असल्याचं कळत आहे. दरम्यान, अद्यापही त्यांच्या या दौऱ्याबाबतची सविस्तर माहिती प्रतिक्षेत असून, येत्या काही दिवसांमध्ये या पाहणी दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.  

धीर सोडू नका...

पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावर आले असताना, शेतकऱ्यांना दिलासा देत धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभं आहे असं सांगितलं. त्याचप्रमाणे किती नुकसान झालंय याचं पंचनामे सुरू आहेत, माहिती घेतली जात असून लगेचच मदत जाहिर करू असं आश्वासनही दिल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर, गरज पडल्यास केंद्राकडे मदत मागू, आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कोकण दौऱ्याकडेही अनेकांचं लक्ष असेल.