छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले 'त्यांनी शपथ घेऊन...'

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामुळे आता छगन भुजबळ अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडणार का? अशा शंका व्यक्त होत आहेत.  

शिवराज यादव | Updated: Jun 18, 2024, 08:21 PM IST
छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले 'त्यांनी शपथ घेऊन...' title=

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत पक्षाने डावलल्याने छगन भुजबळ नाराज असून, समर्थकांच्या दबावामुळे ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र छगन भुजबळ यांनी हे वृत्त चुकीचं असून आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे. 'झी 24 तास'शी संवाद साधताना त्यांनी आपण ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे 

नेमकं वृत्त काय?

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. सूत्रांनुसार, छगन भुजबळ यांना पक्षात स्वीकार करण्याबाबत आणि ज्येष्ठतेनुसार त्यांना सामावून घेण्याबाबत ठाकरे गटातील नेत्यांशी प्राथमिक बोलणी सुरू आहेत. छगन भुजबळ यांनी शिंदे गटातील विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगाव विधानसभा मतदारसंघावर आपले पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी दावा केला आहे. सोबतच स्वतःसाठी येवला विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. 

100 टक्के मी भेटलेलो नाही - छगन भुजबळ 

"8 जूनला अजित पवारांच्या घरी बैठक होती. आम्ही दिवसभर तिथेच होतो, चर्चा सुरु होती. 13 जूनला सुनेत्राताईंचा राज्यसभेचा फॉर्म भरण्यात आला. 14 जूनला मी पुण्याला गेलो होतो. महात्मा फुले वाडाच्या कामासंदर्भात अजितदादांनी बैठक बोलावली होती. तिथून मी नाशिकला गेलो. नाशिकला 15 जूनला येवल्यात होतो. 16 जूनला संध्याकाळी मी परत आलो. मी नाराज नाही आणि कोणाला भेटलेलो नाही. 100 टक्के मी भेटलेलो नाही. त्यांना शपथेवर भेट झाली का विचारा. काहीही सांगितलं जात आहे," अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

आतापर्यंत नेमक्या काय घडामोडी घडल्या?

- लोकसभेला दिल्लीतून हिरवा कंदील असतानाही उमेदवारी जाहीर करायला विलंब केल्यानं भुजबळांनी माघार घेतली 

- फायर ब्रँड नेते म्हणून ओळख असतांना चंद्रपूर वगळता भुजबळांना निवडणुकीत प्रचारापासून दूर ठेवण्यात आलं

- राज्यसभेला संधी असतांना भुजबळांना संधी देण्यात आली नाही, त्यामुळे दिल्लीत जाऊन मंत्रिपद पदरात पाडून घेण्यात भुजबळांना यश आलं नाही 

- केंद्रातील सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच राज्यमंत्री मिळणार असल्यानं प्रफुल्ल पटेल त्यासाठी आग्रही

- पक्षातील अंतर्गत कलह बघता भुजबळांना राज्यसभेसह मंत्रिपदापासून दूर राहावे लागणार अशी शक्यता अधिक 

- भुजबळांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात कमळ असल्याचं उघडपणे सांगितल्याने त्यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या असे असतांना एकदा कार्यालयातुन बाहेर पडत असताना थेट बागेतील कमळ हातात घेऊन भुजबळांनी केलंले फोटोसेशन भाजप प्रवेशाच्या चर्चेचा विषय बनलं होत

- अशातच सगेसोयरे बाबत सरकारमध्ये अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींवर अन्याय होईल असे सांगून अजित पवार ठोस भूमिका घेत नसल्यानं भुजबळ नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे