वादग्रस्त वक्तव्यानंतर अमोल मिटकरी म्हणतात की...'मला माफी मागण्यास सांगणाऱ्यांनी आधी...'

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी सांगलीतील सभेत कन्यादानासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. 

Updated: Apr 22, 2022, 11:07 AM IST
वादग्रस्त वक्तव्यानंतर अमोल मिटकरी म्हणतात की...'मला माफी मागण्यास सांगणाऱ्यांनी आधी...' title=

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी सांगलीतील सभेत कन्यादानासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांच्या व्यक्तव्यामुळे पक्षावर टीकेची झोड उठत असताना खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. पुण्यात काल ब्राम्हण महासंघ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही राडा पाहायला मिळाला. भाजपनेही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, याप्रकरणी स्वतः अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल मिटकरी यांनी कन्यादानासंदर्भातील केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांकडूनही टीकेची झोड उठत आहे. यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, 'माझ्या बोलण्याचा भाजप आणि काही इतर संघटनांनी विपर्यास करून सांगितला. तसेच मला माफी मागायला सातत्याने सांगितलं जात आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसची बदनामी करीत आहे. माझ्या पक्षाची अशी शिकवण नाही. तसेच शिव, शाहू फुले आंबेडकर, आण्णाभाऊ साठेंनी अशी कुणा धर्माविरूद्ध बोलावं अशी शिकवण दिलेली नाही'. असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.

मला माफी मागायला लावणाऱ्यांना माझं आवाहन आहे की, 'राजा शिवछत्रपती कादंबरीमध्ये ज्या बदनाम्या झाल्या आणि त्यांचाच पुरस्कार करण्याचं वातावरण महाराष्ट्रात सुरू आहे. त्या पुरंदरे यांनी लिहलेल्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या अपमानकारक मजकूराची माफी मागावी'.

'राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी तर त्यांबद्दल माफी मागितलेली नाही. मी कुणाच्या जातीविरूद्ध धर्माविरूद्ध बोललो नाही, भाजप प्रणित संघटनांनी यामध्ये फक्त राजकारण चालवलं आहे.' असं मिटकरी यांनी म्हटले.

'मम भार्या समर्पयामी' म्हणजे... अमोल मिटकरींच्या त्या वक्तव्यावरुन वाद

अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात एक किस्सा सांगितला. मी एका लग्नात गेलो होतो. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते,'मम भार्या समर्पयामी'. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं. अरे येड्या ते महाराज म्हणतायत, मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा, आरारारा... कधी सुधारणार. असं मिटकरी यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. 

अमोल मिटकरींच्या या विधानावर ब्राम्हण समाज आक्रमक झाला असून मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मिटकरींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.