नांदेड : घराशेजारी कचरा जाळला म्हणून एका युवकाने गोळाबार केल्याची घटना शहरात घडलीय. गोळीबार करुन हा युवक घरात जाऊन बसला. पोलिसांनी त्याला त्याब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडे १० जीवंत काडतुसे मिळाली. ३५ वर्षीय आसिफ पठाण असं गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव आहे. शहरातील वर्कशॉप भागातील एस टीच्या विभागीय कार्यालय परिसरात ही घटना घडली. एस टी कार्यालयाच्या परिसरातील साफसफाई करुन कर्मचाऱ्यांनी कचरा जाळला.
आसिफ पठाण यांच्या घराच्या पाठीमागे हा कचरा जाळण्यात येत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या आसिफने कार्यालय परिसरात येऊन एसटी कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या दांड्याने मारहाण केली. वाद वाढल्याने रागात आलेल्या आसिफने आपल्या बंदुकीतून एक गोळी झाडली. गोळी कोणालाही लागली नाही. मात्र परिसरात दहशत पसरली.
गोळीबार केल्यानंतर आसिफ घरात जाऊन बसला. हा गोंधळ बराच वेळ चालला, त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांच्या मदतीने त्याची समजूत काढली. त्यानंतर तो स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला. पोलिसांनी आसिफला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्या खिशातून १० जिवंत काडतुसे मिळाली.