मोदींच्या प्रचाराचा साताऱ्यातून शुभारंभ

विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत.

Updated: Oct 6, 2019, 07:47 PM IST
मोदींच्या प्रचाराचा साताऱ्यातून शुभारंभ title=

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. साताऱ्यातील सभेमधून मोदींच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा १७ ऑक्टोबरला होणार आहे. उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तिथे पोटनिवडणूक होत आहे.

या पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या प्रचाराला मोदी येणार असल्यामुळे राजे समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. त्यातच मोदी राजेंचा प्रचार करणार असल्यानं राजेसमर्थक जोमात दिसणार आहेत.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे दोघं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, पण काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला, यानंतर साताऱ्यामध्ये पोटनिवडणूक होत आहे. विधानसभा निवडणूक आणि साताऱ्याची पोटनिवडणूक या एकाच दिवशी होणार आहेत. २१ ऑक्टोबरला निवडणूक होऊन २४ ऑक्टोबरला निकाल लागणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाजपचे स्टार प्रचारक आहेत. मोदी महाराष्ट्रात १० आणि अमित शाह २० सभा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.