...म्हणून भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला- नितेश राणे

प्रत्येक गोष्टीवर दोघांचं एकमत होणं हे कोणाच्याच घरात शक्य नसल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. 

Updated: Oct 14, 2019, 12:27 PM IST
...म्हणून भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला- नितेश राणे

दीपक भातुसे, झी मीडिया, कणकवली : निलेश हे माझे मोठे भाऊ असल्याने ते मला कधीही मार्गदर्शन करू शकतात. प्रत्येक गोष्टीवर दोघांचं एकमत होणं हे कोणाच्याच घरात शक्य नसल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. निलेश यांना राजकारणाचा एक वेगळा अनुभव आहे, त्यांना एक वेगळा दृष्टीकोन आहे. ट्विटबाबत माझे निलेश यांच्याबरोबर बोलणे झाले. त्यांनी मला सांगितले मला तुझा हा विषय पटला नाही माझी भूमिका वेगळी आहे. कोकणाच्या जनतेची इच्छा होती म्हणून भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून काम करावं लागणार अशी माझी भूमिका आहे. आदित्य ठाकरे सभागृहाचे सदस्य असतील तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल असे मी बोललो होतो, एका आमदारपुरता बोललो नव्हतो असेही नितेश यांनी स्पष्ट केले. 

आमच्या दोघांमध्ये अतिशय उत्तम संवाद आहे. काही बाबतीत मतमतांतरे असतात त्याबाबत आम्ही चर्चा करतो.ते का पटले नाही हे त्यांनी मला सांगितले असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. राणे कुटुंबियांबद्दल तुम्ही कुठलीही चिंता करू नका.आमचा फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे, तो काही तुटणार नाही असे ते म्हणाले.

दिलेला शब्द पाळणार

राजन तेली अपक्ष उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आणि आम्ही एकत्र घेतलाय. माझ्या विरोधात तर शिवसेनेने अधिकृत उमेदवार दिलाय. त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेही येतायत.
उद्धव ठाकरे यांनी सभेत टीका केली तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळणार, मी टीका करणार नाही. मुख्यमंत्र्यांना आम्ही शब्द दिलाय शिवसेनेवर टीका करणार नाही त्यावर मी ठाम आहे. आज मी भाजपाचा आमदार म्हणून निवडणूक लढवतोय. माझ्यामुळे भाजपाच्या दीडशे मतदारसंघात त्यांना अडचणीत आणायचं नाही. कारण त्या मतदारसंघात त्यांना शिवसेना मदत करतेय.

नाणार प्रकल्पाबाबत जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे तिच आमची भूमिका आहे. लोकांना विश्वासात घेऊनच याबाबत भूमिका घेऊ. राणे कुटुंबियांनी भाजपात जाऊन काय मिळवलं, कणकवलीची एक जागा मिळाली, दुसरं काहीच मिळालं नाही? असा प्रश्न उपस्थित करत वाघ जेव्हा दोन पावलं मागे घेतो ते मोठी झेप घ्यायला, आज आम्ही दोन पावलं मागे घेतलीयत भविष्यात आमची झेप मोठी असेल हे लक्षात घ्या असे ते म्हणाले.

महत्त्वाचे मुद्दे 

- मागील पाच वर्ष महत्वाचे प्रकल्प रखडले, प्रशासनावरची पकड ढिली झाली त्यामुळे कोकणाचे नुकसान झाले
- 2014 पर्यंत राणे साहेबांनी कोकणाला विकासाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं
- सी वर्ल्ड प्रकल्पाला निधी दिला होता, विमानतळाचे काम पूर्ण होत आलं होतं, रस्त्याची कामं सुरू होती
- मात्र 2014 नंतर या कामांचा पाठपुरावा झाला नाही 
- पालकमंत्र्यांनी कोकणाचा विकास रखडवला
- मोठ्या प्रमाणात पैसा आला असता तर कोकणाचा विकास झाला असता
- सी वर्ल्ड प्रकल्प रखडला, विमानतळ सुरू झाले नाही
- मी निवडणूक का लढवतोय, विकाससाठी निवडणूक लढवतोय तर शिवसेनेवर टीका करून काय उपयोग
- ज्या मुद्यावर निवडणूक लढवून लोकांच्या जीवनात फरक पडणार नाही त्या मुद्यावर निवडणूक लढवणार नाही