दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली नसल्याने उदयराजेंच्या भवितव्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
'मेरे पास छत्रपती घराणा है' असे भाजपा आता छातीठोकपणे सांगत आहे. आधी कोल्हापूरचे संभाजीराजे, नंतर सातारचे शिवेंद्रराजे आणि त्यांच्यापाठोपाठ उदयनराजेंना भाजपाने पक्षात प्रवेश दिला. २०१४ च्या निवडणुकीत छत्रपतींचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा भाजपाने दिली होती. आता तर या निवडणुकीत छत्रपतींच्या घराण्यातील सर्वजण बरोबर असल्याने त्याचा वापर भाजपाकडून केला जाणार आहे.
मात्र यातील मूडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयनराजेंच्या पुढील भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण सातारा लोकसभेची पोट निवडणूक विधानसभेबरोबर व्हावी अशी उदयनराजेंनी भाजपाकडे मागणी केली होती. मात्र तसे होत नसल्याने उदयराजेंचे टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत. यामागचे नक्की राजकारण समजून घ्यायला हवे.
साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन चुलत भावांमध्येच राजकीय संघर्ष आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवेंद्रराजे आपल्याला सहकार्य करतील का? अशी शंका उदयनराजेंच्या मनात होतीच. मात्र तेव्हा उदयनराजेंनी जुळवून घेतल्याने संघर्ष विसरून शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना निवडणुकीत मदत केली. मात्र लोकसभा निवडणूक संपताच पुन्हा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हा संघर्ष साताऱ्यात अनुभवायला मिळाला.
शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादी सोडली त्यामागे उदयनराजेंबरोबरचा संघर्ष हे एक कारण होतेच. त्यातच उदयनराजेंनीही भाजपात प्रवेश केला. खासदारकीचा राजीनामा देताना विधानसभेबरोबर लोकसभेची पोटनिवडणुक झाली तर शिवेंद्रराजेंचे साताऱ्यात आपल्याला सहकार्य मिळेल असा उदयनराजेंचा कयास होता. मात्र तसे झालेले नाही.
त्यामुळे नंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवेंद्रराजेंचे सहकार्य मिळेल का? वेगळी निवडणूक झाली तर आपली अडचण वाढेल का? असे प्रश्न उदयराजेंसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंना भाजपाने धक्का दिलाय का? अशी चर्चाही साताऱ्यात सुरू झाली आहे.