राहुल गांधींच्या अंगावर स्फोटके बांधून दुसऱ्या देशात सोडा- पंकजा मुंडे

काही जण हा सर्जिकल स्ट्राईकविषयी शंका उपस्थित करत आहेत.

Updated: Apr 22, 2019, 06:54 PM IST
राहुल गांधींच्या अंगावर स्फोटके बांधून दुसऱ्या देशात सोडा- पंकजा मुंडे title=

मुंबई: भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर शंका उपस्थित करणाऱ्या राहुल गांधी यांच्या अंगावर स्फोटके बांधून त्यांना दुसऱ्या देशात सोडले पाहिजे, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्या रविवारी जालना येथील प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी पंकजा यांनी म्हटले की, पुलवामात दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला. मात्र, काही जण हा सर्जिकल स्ट्राईक नेमका कसा झाला, हे विचारत आहेत. त्याचे पुरावेही मागत आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश आहे. माझ्या मते त्यांच्या अंगावर स्फोटके बांधून त्यांना दुसऱ्या देशात सोडले पाहिजे. मग त्यांना नेमकी परिस्थिती समजेल, असे पंकजा यांनी म्हटले. 

पंकजा यांच्या या वक्तव्याला आता काँग्रेस कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी पंकजा यांनी अशाप्रकराची वक्तव्ये करून अनेकदा वाद ओढवून घेतला आहे. 

२०१६ मध्ये उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २० जवान शहीद झाले होते. यानंतर भारतीय लष्कराने पाकच्या हद्दीत शिरून सीमारेषेलगतचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर भारतीय वायूदलाकडून नुकताच पाकव्याप्त बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला होता. या दोन्हीवेळी भारतीय लष्कराने अनेक दहशतवाद्यांना ठार मारले होते. 

मात्र, विरोधकांकडून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मोदी सरकारने सर्जिकल आणि एअर स्ट्राईकमध्ये नक्की किती दहशतवादी ठार झाले, याचे पुरावे द्यावेत, अशी मागणी काँग्रेससह विरोधकांनी लावून धरली होती. मात्र, मोदी सरकारने ही मागणी फेटाळत विरोधकांना चांगलेच फटकारले होते.