'पालिकेतील गोंधळामुळे औंरगाबादकरांच्या खऱ्या समस्या मागेच राहणार'

या सगळ्यात शहराचा विकास मात्र पुर्णपणे हरवणार हे निश्चित मानले जात आहे. 

Updated: Jun 13, 2019, 06:58 PM IST
'पालिकेतील गोंधळामुळे औंरगाबादकरांच्या खऱ्या समस्या मागेच राहणार' title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. शहराचे नवे खासदार इम्तियाज जलील यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडावा म्हणून एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. तर शिवसेनेनं हा प्रस्ताव मांडण्यास मज्जाव केला. त्यामुळे सुमारे दोन तास सभागृहात मोठा गोंधळ झाला. यात महापौरांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत एमआयएमच्या 20 नगरसेवकांना निलंबित केले आहे. या सर्व गोंधळामध्ये औरंगाबादकरांचे महत्त्वाचे प्रश्न मागेच राहिले आणि पुढेही असेही राहीले तर नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होणार आहे. 

तब्बल 3 तास हे मानापमान नाट्य सुरु होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाल्यावर महापौरांनी देशातील सगळ्याच नगरसेवकांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला. मात्र याला विरोध करीत एमआयएमचे नगरसेवक इम्तियाज जलील यांचा वेगळा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडावा यासाठी आग्रही होते. महापौरांनी ही मागणी फेटाळल्यानं एमआयएम नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट घोषणाबाजी सुरु केली, महापौरांच्या आसनासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत आता आंदोलन सुरुच राहिल असा पवित्रा त्यांनी घेतला. शिवसेना सातत्याने दडपशाही करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि महापालिका सभागृहातच आक्रमक आंदोलन सुरु केले.

दुसरीकडे महापौर नंदकुमार घोडेले मात्र त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते. एकच एक प्रस्ताव पुन्हा पुन्हा मांडता येत नाही असं सांगत त्यांनी प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला, एमआय़एमच्या नगरसेवकांना शहराचं वातावरण खराब करायचं आहे. त्यामुळं ते असली आंदोलन करीत असल्याचे महापौरांनी आरोप केला. महापौरांनी त्यांचे अधिकार वापरत एमआयएमच्या 20 नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केले आणि भविष्यातही या नगरसेवकांनी असाच गोंधळ घातला तर यांचे सदस्यत्व कायम रद्द करण्यासाठी शासनाला अहवाल पाठवणार असा दमही त्यांनी भरला.

या सगळ्यानंतरही एमआयएम नगरसेवक बाहेर जात नसल्यानं अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत नगरसेवकांना उचलून बाहेर नेलं, पोलिसांच्या फौजफाट्याच्या सहाय्यानं एमआय़एमच्या नगरसेवकांना उचलून बाहेर नेण्यात आलं, या सगळ्याचा खासदार इम्तियाज जलील यांनी निषेध केलाय, फक्त राजकारणापोटी यांना अभिनंदन करायचं नसल्याचा आरोप जलील यांनी केलाय, आता यापुढं शहराच्या महापौरांचे घोटाळे आपण बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

खरे तर आज सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्न, शहराच्या रस्त्यांवर चर्चा होणे अपेक्षीत होतं, मात्र एमआय़एम असो वा शिवसेना-भाजप सगळ्यांनीच गोंधळ करण्यावर आणि तो वाढवण्यावर भर दिला. यात विकासकामं मात्र मागे पडली. लोकसभा निवडणूकानंतर शिवसेना एमआय़एम वादाचा हा पहिला अंक औरंगाबादन पाहिला. आता हा सुरु झालेला वाद असाच सुरु राहणार यात शंका नाही मात्र या सगळ्यात शहराचा विकास मात्र पुर्णपणे हरवणार हे निश्चित मानले जात आहे.