औरंगाबाद : क्रिकेटपटू विराट कोहलीची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची तुलना करणे अत्यंत चुकीची आहे, असे मत क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने येथे व्यक्त केले. एका खासगी कार्यक्रमाला हरभजन आला होता त्यावेळी त्याने हे मत व्यक्त केले. सचिन तेंडुलकर ज्याकाळी खेळत होता, त्या काळी खेळ अत्यंत कठीण होता. ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, श्रीलंका या टीममध्ये अत्यंत तगडे खेळाडू होते. त्यामुळे त्यावेळी खेळ एक मोठी परीक्षा असायची. मात्र सध्याच्या काळात क्रिकेटचा स्तर खालावला आहे. खेळ मंदावला आहे आणि त्यामुळे खेळणं जास्त सोपं झाले आहे, असे हरभजन म्हणाला.
सचिन, सचिन आहे. सचिनची कोणाशीही बरोबरी होऊ शकत नाही. सचिन याने जगाला क्रिकेट दाखवले आणि शिकवले आहे. आताच्या काळातील खेळाडूंची नावही लक्षात राहत नाही. त्याकाळी ज्या वेळेस सचिन खेळत होता, तेव्हा क्रिकेटपटूंची नावं लोकांच्या तोंडावर असायची. आता एक किंवा दोन क्रिकेटरची नाव आपण सांगू शकत नाही, अशी वेळ क्रिकेटवर आली, असल्याचे हरभजन सिंग म्हणाला.
सचिन खेळला त्याकाळी वकार युनीस, वसीम अक्रम, यासारखे गोलंदाज त्याच्यासमोर असायचे आणि त्याने सगळ्यांसमोर खेळून विक्रम केला आहे. त्यामुळे सचिन आणि विराटची तुलना नकोच असे हरभजन म्हणाला. खेळाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे, असे हरभजन म्हणाला.
या देशासोबत खेळू नका त्याच देशात सोबत खेळू नका यातून नक्की काय साध्य होते हे मला कळत नसल्याचं हरभजन सिंग म्हणाला. पाकिस्तानसोबत खेळायला नेहमीच विरोध होतो, मात्र पाकिस्तानसोबत आपण इतर गेम खेळत आहोत, असे हरभजन म्हणाला. पाकिस्तानसोबत व्यापार चालतो, पाकिस्तानला जाण्याचे रस्ते सुरु होतात. मग क्रिकेटलाच विरोध का होतो, असा सवाल त्याने उपस्थित केला.
खेळाला राजकारणापासून पूर्णतः सोडायला हवे आणि खेळाडूंना त्यांचा खेळ खेळू द्यायला हवा. आता इम्रान खान आणि सिद्धू हे दोन्हीही ज्येष्ठ क्रिकेटर राजकारणी झालेले आहे, त्यांनी तरी यावर तोडगा काढावा असे मत हरभजन याने व्यक्त केले. दोन-तीन महिन्यानंतर भारत कोणासोबत तरी खेळत असतो त्यामुळे लोकांनी आता किती सामने पहावे असाही प्रश्न लोकांना पडला आहे, असे तो म्हणाला.
त्यावेळी म्हणजे आमच्या काळी अनेक क्रिकेट टीम अत्यंत तगड्या होत्या. त्यामुळे लोकांना या तगड्या मॅचेस पाहायला आवडायचं मात्र आता क्रिकेटचा दर्जा घसरला आहे, क्रिकेटचा स्तर घसरला आहे. त्यामुळे कदाचित भारतीय टीम मजबूत झाली आहे. भारतीय टीम आहे त्या जागीच आहे आणि इतर टीमचा दर्जा घसरला आहे म्हणून कदाचित आपण मोठं झालं असू शकतो, असंही हरभजन सिंग म्हणाला.