औरंगाबाद : बकरी ईदसाठी सरकारने केलेल्या नियमावलीवरुन एमआयएम खासदार इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झाले आहेत. ही नियमावली मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नक्की कोण अधिकारी आणि काय विचार करून, असे नियम बनवतात? असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
आम्हाला प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करा, असा सल्ला दिला जातो. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला ज्या कार्यक्रमाला जाणार आहेत, तो कार्यक्रम दिल्लीत बसून प्रतिकात्मक का केला जात नाही, असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी विचारला आहे.
बकरी ईदसाठी मशीद उघडण्याला तसंच प्राण्यांची कुर्बानी द्यायला परवानगी द्यावी, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली होती. मात्र कोरोना परिस्थिती पाहता महापालिका हद्दीत सूट मिळणार नाही, असे आदेश औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत.