मुंबई : Maharashtra Cabinet meeting : औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे पुन्हा नामांतर करण्यात आले आहे. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे नाव बदलले होते. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा नामांतर केले आहे. त्यानुसार औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उस्मानाबादचं नाव धाराशिव असंच राहणार आहे. नवी मुंबई विमानतळाचं नाव आता लोकनेते दि. बा. पाटील असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच ठराव करुन केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. येत्या अधिवेशनात ठराव करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
दरम्यान, विकासकामांसाठी 60 हजार कोटींचं कर्ज उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कोणताही प्रकल्प रखडू नये यासाठी तजवीज करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ नसलं तरी कुठलेही निर्णय थांबलेले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचवेळी पालकमंत्र्यांची नियुक्ती लवकरच होईल. सध्या राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजुरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
Maharashtra cabinet, today, decided to rename Aurangabad as Sambhajinagar & Osmanabad as Dharashiv. Navi Mumbai airport renamed DB Patil airport. Decision was earlier taken by Uddhav Thackeray in his last cabinet, but it was illegal. So, this was decided today:CM & Dy CM announce pic.twitter.com/Yd9ix96xGP
— ANI (@ANI) July 16, 2022
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 12.56 योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. दि.बा.पाटील यांचे योगदान आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले 22.5 टक्के योजनेचे धोरण सुद्धा 12.5 टक्के धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खासगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि.बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण "लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली, असे ते म्हणाले.