औरंगाबाद जि.प. निवडणुकीत नाट्यमय वळण, विद्यमान अध्यक्षांची बंडखोरी

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ झाला.  

Updated: Jan 3, 2020, 05:37 PM IST
औरंगाबाद जि.प. निवडणुकीत नाट्यमय वळण, विद्यमान अध्यक्षांची बंडखोरी
संग्रहित छाया

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ झाला. शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी टर्म संपल्यानंतरही बंडखोरी करून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी माघार घेत डोणगावकर यांना पाठिंबा जाहीर केला. महाविकास आघाडीच्या मीना शेळके आणि डोणगावकर अशी थेट लढत झाली. यात दोघींनाही २९ मते मिळाली. त्यानंतर गोंधळ झाला आणि निवडणूक प्रक्रियाच पुढे ढकलण्यात आली. आता उद्या पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

औरंगाबाद महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोणगावकर यांना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समसमान २९ मते पडल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या पुन्हा होणार आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या उमेदवार मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांना समसमान मते पडल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून ही निवडणूक उद्या दुपारी २ वाजता पुन्हा घेण्यात येणार आहे. 

डोनगावकर या महाविकास आघाडीच्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. मात्र आज सकाळी त्यांनी अध्यक्ष पदासाठी पुन्हा अपक्ष अर्ज दाखल केला. त्यानंतर भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेऊन शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोनगावकर यांना पाठिंबा दिला. सभागृहात अध्यक्ष पदासाठी मतदान झाल्यानंतर दोन्हीही उमेदवारांना समसमान २९ मते मिळाल्याची चर्चा आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत एकूण ६१ सदस्य असून सत्ता स्थापनेसाठी ३१ मतांची गरज आहे. त्यामुळे आज सभागृहात अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत असलेल्या दोन्हीही उमेदवारांना एकूण ५८ मते पडली. 

दरम्यान नेमका काय प्रकार घडला हे आपल्याला माहिती नाही. पण अशा प्रकारामुळे सदस्य पळवा पळवीचे प्रकार घडतील असे आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या लक्षात हा प्रकार आला नसल्याचे दिसले.