आडमुठेपणाची भूमिका रेल्वेमंत्र्यांना शोभत नाही, थोरातांचा टोला

बाळासाहेब थोरात यांची रेल्वेमंत्र्यांच्या भुमिकेवर नाराजी

Updated: May 25, 2020, 04:25 PM IST
आडमुठेपणाची भूमिका रेल्वेमंत्र्यांना शोभत नाही, थोरातांचा टोला  title=

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून सध्या ट्वीटर वॉर पाहायला मिळतंय. स्थलांतरित मजुरांची यादी द्या, उद्याच्या उद्या १२५ ट्रेन महाराष्ट्रात पाठवतो असे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले. यानंतर त्यांना यादी पाठवल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले पण ती मिळाली नसल्याचे पुन्हा गोयल यांनी सांगितले. याप्रकरणात आता बाळासाहेब थोरात यांनी उडी घेतली आहे. रेल्वे मंत्र्यांना हे शोभत नाही, ते मुंबईचे आहेत. त्यांनी सहकार्याची भूमिका ठेवायला हवी. आपण राष्ट्रीय कार्य करतोय ही भावना हवी पण दुर्देवाने ते दिसत नसल्याचे थोरात म्हणाले. 

दुसर्‍या दिवशी ज्या रेल्वे सोडणार आहेत त्याची यादी आपण आदल्या दिवशी देत गेलो आहोत. स्थलांतरित मजुरांसाठी १५७ ट्रेनची राज्य सरकारला गरज आहे. गरजेपेक्षा कमी ट्रेन केंद्र सरकार पाठवत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून निदर्शनास आणले होते. हे विधान रेल्वेमंत्री गोयल यांच्या जिव्हारी लागले. त्यानंतर त्यांनी ट्वीट करत तासाभरात यादी मागायला सुरुवात केली. 

यापूर्वी आम्ही जितक्या रेल्वे मागत होतो त्याच्या निम्म्या मिळत होत्या ही वस्तुस्थिती आहे. स्थलांतरित मजुरांची यादी द्या हे  बोलणं बरोबर नाही. जी सिस्टम आहे त्यात रेल्वे वाढवून द्या मग आम्ही यादी देतो असे थोरात म्हणाले. याही संकटात फडणवीस विरोधी पक्षाची भूमिका बजावतात हे दुर्देवी असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलायत, हे विसरु नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना टोला

दोन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये लाखो मजूरांना राज्य शासनाने, इथल्या स्वयंसेवी संस्थानी सांभाळले. त्यांना घरी जायचे तर घरी जाण्याची मोफत व्यवस्था करतोय. त्यांना घरातल्या माणसासारखे सांभाळले. रेल्वेतून जाताना त्यांना जेवणाचा डबा, पाणी देतोय, त्यांना सन्मानाने पाठवतोय त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी टीका करू नये असे देखील थोरात म्हणाले. 

राज्य सरकार म्हणते यादी पाठवली, पियुष गोयल म्हणतात मिळालीच नाही

राज ठाकरे यांच्या मागणीवर देखील थोरात यांनी भाष्य केले. कोरोनाच्या संकटात बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. परराज्यातील असेल तरी या राष्ट्रातील ते नगारीक आहेत हे विसरून चालणार नाही. हे परत आले तर त्याबाबत नियोजन करावं लागेल. त्यांचा डाटा असायला हवा याबाबत राज्य सरकार विचार करेल असे थोरात यांनी राज ठाकरेंच्या मागणीवर म्हटले. परराज्यातील मजुरांची नोंद केल्याशिवाय त्यांना घेऊ नये अशी मागणी राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेनंतर केली होती.