शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?

नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, सरकारच्या सुस्तावलेल्या सिस्टीमुळे ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  सातपुडा देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र बनू शकते. मात्र हक्काचे खावटी अनुदान ज्या आदिवासींना मिळत नाही त्यांना पर्यटनाचा निधी मिळाले याबाबत शंकाच आहे.

Updated: Aug 7, 2023, 11:37 PM IST
शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत? title=

प्रशांत परदेषी, झी मीडिया, नंदुरबार :  शाहरुखच्या स्वदेश चित्रपटात दाखवलेला धबधबा महाराष्ट्रात आहे.  नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. याठिकाणी गेल्या 4 वर्षापासून दुर्घटना होत आहेत. जोवर सरकार उपाययोजना करत नाही तोवर पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय गावक-यांनी घेतला आहे (Nandurbar Baradhara Waterfall).

सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये नैसर्गिक पर्यटनाची संधी

गुजरात राज्य नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा परिसर पर्यटन पंढरी म्हणून विकसित करीत आहे. मात्र, याच सरोवराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या महाराष्ट्राला या निसर्गाच्या उधळणीचा आणि सरोवराच्या पाण्याचा लाभ घेता आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार सरोवरा लगत स्टॅचू ऑफ युनिटी उभारला आणि त्याच भागात जागतिक पर्यटन केंद्र विकसित केले. तशीच किंबहुना त्याहून सरस नैसर्गिक पर्यटनाची संधी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मात्र महाराष्ट्र सरकाराच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे या भागातील पर्यटन विकासाकडे लक्ष दिले गेलेलं नाही. 

पर्यटन स्थळ विकसीत करण्याची मागणी

गुजरात सरकार आणि त्याच्या मदतीला केंद्र सरकार सरोवराच्या शेजारी ज्या पद्धतीने मोठ्या उद्योजकांना पूरक भूमिका घेऊन केवडीया परिसरात एकामोगोमाग एक पर्यटन केंद्र विकसित करीत आहे, त्यापद्धतीने महाराष्ट्रात उद्योग धार्जिणे धोरण न अंमलात आणता स्थानिकांना सोबत घेऊन त्यांची उन्नती होईल या विचाराने पर्यटन विकास केला गेला तर या भागातील स्थलांतर, कुपोषण, बेरोजगारी , निरक्षरता असे सर्व प्रश्न निकाली निघणार आहेत.  सातपुड्याच्या या डोंगर रांगांमध्ये तोरणमाळ, डाब हि थंड हवेची ठिकाणे आहेत. शेकडो मैल नर्मदेचे अडवलेले पाणी आहे.  बिलगावचा ऐतिहासिक धबधबा याच भागात आहे. महूची फुल .. औषधी वनस्पती .. असं निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर नेहमी पर्यटन विकासापासून लांब राहिला आहे.  

12 विविध ठिकाणावरून एकच धबधबा प्रवाहित होतो

बिलगावच्या या धबधब्याला बारामुखी धबधबा ही म्हटलं जातं. उदय नदी वर असलेला हा धबधबा पावसाळ्यामध्ये सर्व पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. 12 विविध ठिकाणावरून एकच धबधबा वाहण्याच बहुदा हे देशातलं एकमेव ठिकाण असेल. एकाच डोंगरावरून बारा ठिकाणावरून कोसळणारा हा धबधबा आपलं रौद्ररूप धारण करतो, तेव्हा चांगल्या चांगल्यांची भंबेरी उडतो. 

धबधबा दिसायला जितका आकर्षक आहे तितका तो जीवघेणा 

अभिनेता शाहरुख खान यांचा स्वदेश चित्रपट याच धबधब्यावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या प्रेरणेतून तयार करण्यात आला होता. ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी नर्मदा सरोवराच्या याच धबधब्यावर  ऊर्जा  प्रकल्प उभारला असल्याचे स्थानिक सांगतात. मात्र आता या प्रकल्पाचे कुठले अवशेष त्या ठिकाणी नसले, तरी हा धबधबा मात्र सर्वांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. उंच कड्यावरून पडणाऱ्या बारा पाण्याच्या धारा या नर्मदा नदीला जाऊन मिळतात. हा धबधबा दिसायला जितका आकर्षक आहे तितका तो जीवघेणा देखील आहे. या ठिकाणी धबधब्याच सुंदर रूप पाहून अनेक जणांना पाण्यात उतरण्याचा मोह टाळला जात नाही आणि पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जण या ठिकाणी बळी पडतात. हीच बाब लक्षात घेऊन स्थानिक नागरिक ग्रामस्थांनी आता या धबधब्यावर सुरक्षा कठळे निर्माण होत नाही तोवर पर्यटकांना बंदी घातली आहे. शासनाने या धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षित कठडे बांधावे जेणेकरून पावसाळ्यामध्ये पर्यटन या ठिकाणी सुरू होऊ शकेल आणि या भागातल्या आदिवासी बांधवांना रोजगाराचे एक नाव साधन उपलब्ध होईल.