बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. धर्माळा तालुका केजर येथे गुंडानी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. मध्यस्थी करणाऱ्या सरपंचाला कोयता लागला आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाला अद्याप कोणतीही माहिती नाही. राष्ट्रवादी बीडच्या सोशल मीडिया फेसबुक पेजवर याबाबत वृत्त देण्यात आले आहे. बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सौ. सारिका या जिल्हा परिषद सदस्या आहे.
या कठिणप्रसंगी माझ्या आणि आपले उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी असलेल्या बीड जिल्ह्यातील तसेच सबंध महाराष्ट्रातील लोकशाहीवादी नागरिकांचे आभार. मात्र, आपण कोणीही काळजी करू नका, मी सुखरुप आहे. आपणासर्वांची साथ आहे, तोपर्यंत जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवत राहीन, सर्वसामान्यांसाठी लढत राहील, अशी हल्ल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालकमंत्री पंकजा मुंडे समर्थकांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यावर हल्ला केला होता. भाजप लोकसभा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे संतापलेल्या पंकजा मुडेंच्या समर्थकांनी काँग्रेसचे पदाधिकारी दादासाहेब मुंडे यांना बेदम मारहाण केली. बीड जिल्हाधिकारी कार्यलयातच ही मारहाण करण्यात आली होती. दादासाहेब मुंडे हे पूर्वी भाजपचे पदाधिकारी आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. सध्या ते काँग्रेस पक्षात असून त्यांनी प्रीतम मुडेंच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली.