आरोग्याशी खेळ! तुमच्या किचनमधील भाजीपाला सार्वजनिक शौचालयातला? किळसवाणा Video

दैनंदिन आहारात वापरला जाणारा भाजीपाला सार्वजनिक शौचालयात ठेवला जात असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ बीडमधला असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे. 

Updated: Jun 24, 2023, 04:10 PM IST
आरोग्याशी खेळ! तुमच्या किचनमधील भाजीपाला सार्वजनिक शौचालयातला? किळसवाणा Video title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : रोजच्या जेवणासाठी लागणारा भाजीपाला (Vegetables) आपण बाजारातून (Market) खरेदी करतो आणि तो स्वच्छ धुवून, कापून किचनमध्ये ठेवतो. पण तुमच्या किचनमधला हा भाजीपाला सार्वजनिक शौचालयातला (Public Toilets) तर नाही ना? बाजारात मिळणारा हा भाजीपाला कुठे ठेवला जातो, हे तुम्हाला माहित आहे का? हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सध्या बीडमधला (Beed) एक किळसवाणा व्हिडिओ (Disgusting Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. बीड भाजी मंडईत असणाऱ्या महिलांच्या सार्वजनिक शौचालयात, भाजीपाला ठेवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओने बीड शहरात खळबळ उडाली आहे. 

भाजी मंडईत असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला भाजी विक्रेते आपलं दुकान थाटून बसतो. दिवसभर भाजीपाला विकतो.  रात्री दहा वाजल्यानंतर उरलेला भाजीपाला बाजूलाच असणाऱ्या नगरपालिकेच्या महिला शौचालयामध्ये ठेवतो आणि त्याला कुलूप लावतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच भाजीपाला आपल्या भाजीपाल्याच्या गाडीवर विक्रीसाठी ठेवतो. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

गरपालिकेने हे शौचालय महिलांसाठी बांधलंय. मात्र हा भाजीपाला विक्रेता या शौचालयाचा वापर कोल्ड स्टोरेज म्हणून करत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे स्वच्छ बीड सुंदर बीड असा नारा बीड नगरपालिका देत आहे. मात्र याच नगरपालिकेने महिलांसाठी बांधलेल्या शौचालयात भाजीपाला विक्रेता आपला भाजीपाला ठेवतोय. आणि तोच भाजीपाला बीडकरांना विकून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आलाय.

दरम्यान या घटनेने बीड शहरात एकच खळबळ उडाली असून बीडकरांमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता नगरपालिका यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलय

पाणीपुरीसाठी शौचालयातलं पाणी
काही महिन्यांपूर्वी असाच किळसवाणा प्रकार कोल्हापूरमध्ये घडला होता. पाणीपुरीसाठी चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर केला जात होता. कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध रंकाळा परिसरात असणारा हा पाणीपुरी विक्रेता शौचालयाच्या टाकीतलं पाणी पाणीपुरीसाठी वापरत होता. इथकंच नाही तर हेच पाणी ग्राहकांना पिण्यासाठीही ठेवण्यात येत होतं. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होताच कोल्हापूरकरांनी या पाणीपुरीवाल्याला चांगलाच हिसका दाखवला.

नवी मुंबईतल्या वाशी रेल्वे स्थानकातही असाच प्रकार घडला होता. वाशी (Vashi) रेल्वे स्थानकातील सार्वजनिक शौचालयात पाणीपुरीचं सामान ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करुन सर्वांसमोर आणला असून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा बेजबादार विक्रेत्यांवर वेळीच कारवाई होण्याची गरज आहे.