माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यामधल्या आथली गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी दहशतीखाली आहेत.
शाळा परिसरातल्या वडाच्या झाडामुळे ते कमालीचे धास्तावले आहेत. कारण उंच वडाच्या झाडावर एक दोन नव्हे तर शंभरच्या आसपास मधमाशांची पोळी आहेत. या मधमाशा इथले विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांना चावा घेत असल्यामुळे, या सर्वांना जीव मुठीत घेऊन इथे वावरावं लागत आहे.
याच धास्तीमुळे शाळेला मोठं पटांगण असूनही इथल्या विद्यार्थ्यांनी कित्येक महिन्यांपासून या पटांगणाचा वापरच केलेला नाहीय.
दर दिवशी मधल्या सुट्टीतही वर्गाबाहेर वावरणाऱ्या मुलांची नजर इथल्या वडाच्या झाडावरच असते. तर जेवणाच्या सुट्टीतही शाळेतर्फे मिळणारं मध्यान्ह भोजन अक्षरशः उरकलं जातं.
शाळेच्या पटांगणातच ग्रामपंचायत कार्यालय असल्यामुळे, इथले कर्मचारी आणि येणा-या नागरिकांचा जीव सतत टांगणीलाच असतो.
त्यामुळे या ठिकाणची मधमाशांची पोळी तातडीनं काढली जावीत असं निवेदन, ग्रामपंचायतीनं वन विभागाला दिलं आहे.
आतापर्यंत इथल्या मधमाशांनी अनेकांना डंख केला आहे. मात्र भविष्यात एखाद्याच्या जीवावर बेतण्यापूर्वीच, इथल्या मधमाश्यांना इतरत्र हलवणं गरजेचं आहे.