'मला तिकीट न देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली', लोकसभा निकालानंतर भावना गवळींनी स्पष्टच सांगितले...

Bhavana Gawali Statement:  लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही दिवसातच भावना गवळी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 6, 2024, 03:12 PM IST
'मला तिकीट न देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली', लोकसभा निकालानंतर भावना गवळींनी स्पष्टच सांगितले... title=
Bhavana Gawali on Loksabha Result

Bhavana Gawali Statement: लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट या सर्वांना सामावून घेत जागावाटप करताना महायुतीची दमछाक झाली होती. दरम्यान उमेदवारी देण्यावरुन, न देण्यावरुन अनेक चर्चा झडल्या. यात जनमत बाजुने नसल्याचे कारण देत भावना गवळींना उमेदवारी नाकारण्यात आली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही दिवसातच भावना गवळी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणातील यावेळची महत्वाची अपडेट समोर येतेय. मला उमेदवारी मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांच्यावर दबाव होता, असा खळबळजनक दावा भावना गवळींनी केलाय. 

मला तिकीट न देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली होती, असे भावना गवळी म्हणाल्या.  

जनतेची इच्छा पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण झाली नाही, त्यामुळेच यवतमाळ-वाशिममध्ये शिंदे गटाचा उमेदवार पडला असे महत्वाचे विधान भावना गवळींनी केले आहे. 

पराभवाची जबाबदारी कोणाची?

यवतमाळ वाशिम लोकसभेत महायुतीच्या उमेदवारांच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी पालकमंत्री संजय राठोड आणि भाजप आमदारांनी घ्यावी. त्यांना विधानसभेत उमेदवारी देतांना सर्व्हे व्हावा अशी अपेक्षा शिवसेना नेत्या भावना गवळी यांनी व्यक्त केली आहे.

रोख कुणाकडे 

भावना गवळींचा रोख कुणाकडे आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण भावना गवळींच्या मागे जनमत नसल्याचे भाजपच्या सर्व्हेतून समोर आल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराच्या पराभवाला त्या कोणाला जबाबदार धरतात? हे त्या कधी स्पष्ट करणार? याकडे लक्ष लागले आहे.

नाराज तरीही प्रचारात उतरल्या

भावना गवळी यांना उमेदवारी नाकारुन  राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी न मिळाल्याने भावना गवळी नाराज होत्या. पण राजश्री पाटील यांच्यासाठी त्या प्रचारात उतरल्या होत्या. शिंदे गटाने ही जागा जिंकावी यासाठी त्यांनी अथक प्रयत्नही केले होते. पण निकाल वेगळा लागला. 

राजश्री पाटलांचा पराभव

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख विजयी झाले. मतदारांनी ठाकरे गटाच्या बाजुने निकाल दिला. संजय देशमुख यांचा 94 हजार 473 इतक्या प्रचंड मताधिक्क्याने विजय झाला.  महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांना 5 लाख 334 इतकी मते मिळाली.