अटल सेतूवर मोठ्या भेगा; सहा महिन्यांत माती खचायला लागली, प्रवास धोकादायक

Atal Setu : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत लोकार्पण केलेल्या अटल सेतूची  दुरावस्था झाली आहे.  काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याचे वाभाडे काढलेत. या सेतू हा जनतेच्या सेवेसाठी की त्यांच्या मरणासाठी बांधलाय असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. 

वनिता कांबळे | Updated: Jun 21, 2024, 05:40 PM IST
अटल सेतूवर मोठ्या भेगा; सहा महिन्यांत माती खचायला लागली, प्रवास धोकादायक   title=

Cracks On Atal Setu : मुंबईतील शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू प्रवाशांच्या जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. मात्र, अवघ्या सहा महिन्यातच या पुलाची दुरावस्था झाली आहे. अटल सेतू पुलावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. अटल सेतू पुलावरावरची माती खचायला लागली आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टला रोडला गळती लागल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर आता महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  

अटल सेतू पुलाची सहा महिन्यांत माती खचायला लागली आहे. पुलाला तडे जात असल्याचा आरोप  काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला आहे. नाना पटोलेंनी अटल सेतू पुलाला तडे गेल्याची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली तर, याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही ते म्हणालेत.

22 कि.मी लांबीचा देशातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या अटल सेतूचं जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन झालंय. या सागरी सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई अंतर अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करता येते. MMRDAमार्फत बांधण्यात आलेल्या टल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये 

  • देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू
  • मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य
  • 22 किमीच्या सागरी सेतूवरून प्रवासासाठी 250 रुपये टोल
  • मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार
  • अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित
  • सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे
  • वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने कॅमे-यात कैद होतात
  • समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार
  • शंभर वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहणार