मोठी बातमी : रिफायनरी येण्याआधी कोकणातील जमिनींवर यांनी मारला डल्ला...

लॉकडाऊन काळात जेव्हा सारं काही ठप्प होतं याच काळात पाच राज्यांसह मराठवाडा, विदर्भातील अनेकांनी कोकणातील हजारो एकर जमिनींवर डल्ला मारला आहे.

Updated: Apr 26, 2022, 05:55 PM IST
मोठी बातमी : रिफायनरी येण्याआधी कोकणातील जमिनींवर यांनी मारला डल्ला... title=

मुंबई : लॉकडाऊन काळात जेव्हा सारं काही ठप्प होतं तेव्हा याच काळात पाच राज्यांसह मराठवाडा, विदर्भातील अनेकांनी कोकणातील हजारो एकर जमिनींवर डल्ला मारला आहे. झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून ही धक्कादायक बातमी समोर आलीय....

लॉकडाऊन आणि त्यानंतर झालेलं चक्रीवादळ यामुळे कोकणातील शेतकरी उद्धवस्त झाला. कोकणातील शेतकऱ्यांच्या याच अस्थिरतेचा फायदा घेत परप्रातीयांनी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील हजारी एकर जमिनी खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या जमीन खरेदी करण्यात पाच राज्यांसह मराठवाडा आणि विदर्भातील लोकही आघाडीवर आहेत.

जानेवारी 2019 ते मार्च 2022 या ऐन कोरोना काळात ही हजारो एकर जमीन खरेदी करण्यात आलीय. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात बहूचर्चेत रिफायनरी प्रकल्प उभा राहतोय. हा रिफायनरी प्रकल्प नाणार गावात होईल की बारसू गावात याचा अद्याप निर्णय होणे बाकी आहे.

मात्र, हा रिफायनरी प्रकल्प कोकणात होईल या दृष्टीनेच त्या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. शाह, चोटाल्या, कोठारी, गुप्ता, राहिज, वांका अशी आडनावे असलेल्या लोकांकडून या जमिनी खरेदी करण्यात आल्यात.

जम्मू - काश्मीर, पश्चिम बंगाल, ओडिशा, युपी, कर्नाटकमधील या पाच राज्यातील लोकांनी कोकणात या हजारो एकर जमिनी खरेदी केल्यात. तर, नागपूर, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नाशिकमधीलही अनेक लोकांनी कोकणात जमीन खरेदी करण्यात इंटरेस्ट दाखविला आहे.

रिफानरीसाठी चर्चेत असलेल्या बारसू-सोलगाव आणि पंचक्रोशीमध्ये हजारो एकर जमिनीची खरेदी झालीय. पण, परराज्यातील लोकांना स्थानिकांआधी रिफायनरीची माहिती कशी मिळाली? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.