Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेतील अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर होणार नसून, कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरेंनी दिली. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत App इन्स्टॉल करायचं आहे, त्यानंतर आपला Login Id तयार करायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्याला Form भरता येईल. App वरील सूचनांप्रमाणे Form भरायचा आहे. आता अर्जासोबत जोडायच्या कागदपत्रांबाबत जाणून घेऊया. आधार कार्डची दोन्ही बाजूची प्रत जोडायची आहे. अधिवास प्रमाणपत्राची प्रत जोडायची आहे, मात्र ते नसल्यास त्याऐवजी महिलेचं 15 वर्षांपूर्वीचं रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि जन्म दाखला, या पैकी कोणतंही 1 जोडायचं आहे. परराज्यात जन्मलेल्या महिलेनं महाराष्ट्रातील अधिवास असणा-या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर तिच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक सादर करायचं आहे. वार्षिक कमाल उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असल्याचं प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मात्र पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट आहे. त्यासाठी रेशनकार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी. तसंच बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत अनिवार्य नाही. मात्र ती असल्यास अपलोड करावी. हे सर्व झाल्यावर अर्जदारानं नमुन्याप्रमाणे हमीपत्र भरायचं आहे. त्यानंतर Form भरल्याचा Message मोबाईलवर येईल तो जपून ठेवायचा आहे.
या आहेत नम्रता कावळे आणि भागीरथीबाई कुरणे. लाडकी बहीण योजनेच्या पोस्टर गर्ल. भाजपचे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात नाक्यानाक्यावर त्यांची पोस्टर्स लावली. धक्कादायक बाब म्हणजे नम्रता कावळेंच्या नव-यानं ती पोस्टर्स पाहिली. तो एवढा संतापला की, बायकोला थेट घटस्फोट द्यायला निघाला. बिच्चा-या दोघीजणी. त्यांनी तत्काळ गावावरून पुण्याला धाव घेतली. आमदारांनी आमची बदनामी केली, असं सांगत त्यांनी आमदार शिरोळे यांच्या विरोधात पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे रीतसर तक्रार केलीय. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी साधा अर्जही केलेला नाही. भीम आर्मीचे पदाधिकारी सीताराम गंगावणे यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोस्टरवरचा दोघा महिलांचा फोटो कापून काढला. आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, योजनेच्या प्रसिद्धीसाठी आपण पोस्टर लावलं होतं. यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केलंय. पोस्टर बॉय आणि पोस्टर गर्ल सिनेमात जे घडलं, तेच पुण्यातही पाहायला मिळालं. सध्या गाजत असलेली लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचावी, यासाठी सत्ताधारी महायुतीकडून खटाटोप सुरूय. मात्र त्यात चुकीच्या महिलांचे फोटो लावले जात असतील तर, केशवसूतांची माफी मागून आम्ही नसू लाडक्या असंच म्हणण्याची वेळ माता-बहिणींवर येईल.