हातवारे, शिवीगाळ अन्... दानवेंच्या वक्तव्यावरून खडाजंगी; राजीनाम्याच्या मागणीसह विरोधकांनी अडवली विधानपरिषदेची वाट

Maharashtra Monsoon Season 2024: सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्यांनी शिवीगाळ केल्याने त्याच्या निषेधार्थ आज प्रसाद लाड यांनी आंदोलन केले आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 2, 2024, 11:49 AM IST
हातवारे, शिवीगाळ अन्... दानवेंच्या वक्तव्यावरून खडाजंगी; राजीनाम्याच्या मागणीसह विरोधकांनी अडवली विधानपरिषदेची वाट title=
BJP demands resignation of Uddhav Sena leader Ambadas Danve over abused BJP MLA Prasad Lad in Legislative Council

Maharashtra Political news: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात सोमवारी विधानपरिषदेत खडांजगी पाहायला मिळाली. आंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप, प्रसाद लाड यांनी केला होता. त्यानंतर आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसाद लाड यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. त्यावेळी त्यांना दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळं आता हा मुद्दा चांगलाच तापला आहे. 

काय घडलं नेमकं?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी निषेधाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर आक्षेप घेताना दानवेंनी आक्रमक भूमिका घेतली. प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात निषेधाचा प्रस्ताव मंजूर करुन तो लोकसभेत पाठवा, अशी मागणी केली होती. त्याचवेळी विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिले. त्याचवेळी लाड यांनी हातवारे केले. त्याचवेळी दानवे आक्रमक झाले आणि त्यांनी लाड यांना शिवीगाळ केली. या प्रकरणानंतर कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. 

विधानपरिषदेत घडलेल्या या प्रकारानंतर आज त्याचे पडसाद उमटले आहेत. प्रसाद लाड यांनी विरोधी पक्षनेत्यांनी शिवीगाळ केल्याने त्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, आणि माझी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. शिक्षा आणि राजीनामा झालाच पाहिजे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. 

प्रसाद लाड काय म्हणाले?

ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझ्या आई बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं आहे.विरोधी पक्षनेत्याला हे किती योग्य वाटतं याचा विचार करायला पाहिजे. लोकप्रतिनिधीबद्दल जो शिव्या देतो याबद्दल मला उद्धव ठाकरेंना देखील विचारायचे आहे.मी स्वत: किती बहादूर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आम्ही सुद्धा लालबाग परळमध्ये मोठे झालो आहोत. माझ्या आईला दिलेल्या शिव्या मला दु:ख व्यक्त झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हे टाकलंय. विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, आणि माझी माफी मागितली पाहिजे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

शिक्षा एक दिवस असेल किंवा एक तासाची असेल प्रश्न हा आहे की आरोपीला अहंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे. शिक्षा आणि राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.