‘शिवशाही’चं वचन देणाऱ्यांनी ‘निजामशाही’ आणलीय, चित्रा वाघ यांचा घणाघात

पैठणच्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Updated: Oct 21, 2021, 07:19 PM IST
‘शिवशाही’चं वचन देणाऱ्यांनी ‘निजामशाही’ आणलीय, चित्रा वाघ यांचा घणाघात

औरंगाबाद : औरंगाबादमधल्या पैठण तालुक्यातील एका गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने एका वस्तीवर हल्ला चढवला. यावेळी दरोडेखोरांनी दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत त्यांना बांधून ठेवलं. तसंच कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांना जबर मारहाणही केली. त्यानंतर एका 23 वर्षीय आणि एका 30 वर्षीय महिलेवर चार दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला.

या घटनेवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारव जोरदार घणाघात केला आहे. औरंगाबाद पैठणतालुका तोंडोळी गावच्या घटनेवरून आपण निजामाच्या राजवटीत राहतोय का हा प्रश्न पडलाय. ओल्या बाळंतीणवर बलात्कार.. गर्भवतीवर अत्याचार.. दरोडेखोर मोकाट.. उरला नाही कायद्याचा धाक.. ‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीय, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. 

चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. 15 दिवसाची बाळांतीण आणि 8 महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झाला आहे. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय. कदाचित, उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्यापर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल, अशी जोरदार टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. 

पैठणमधील धक्कादायक घटना
औरंगाबादमधल्या पैठण तालुक्यातील एका गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने एका वस्तीवर हल्ला चढवला. सुमारास 7 ते 8 दरोडेखोरांननी शेत वस्तीवर हल्ला चढवला. वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत त्यांना बांधून ठेवलं. तसंच कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांना जबर मारहाणही केली. त्यानंतर एका 23 वर्षीय आणि एका 30 वर्षीय महिलेवर चार दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर घरातली रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन दरोडेखोर पसार झाले.