'मी कधीही कुणासमोर झुकणार नाही', पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे?

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात विचारांना मोकळी वाट करून दिली. यावेळी त्यांनी राजकीय संघार्षाचा पाढा वाचला.

Updated: Oct 5, 2022, 02:30 PM IST
'मी कधीही कुणासमोर झुकणार नाही', पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे? title=

Pankaja Munde Speech: भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात विचारांना मोकळी वाट करून दिली. यावेळी त्यांनी राजकीय संघार्षाचा पाढा वाचला. गोपिनाथ मुंडेपासून सुरु झालेला संघर्ष कायम असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. "हा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. चिखल तुडवणं, संघर्ष करणं आमच्या रक्तातच आहे." असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. "जे गोपीनाथ मुंडेंची विरोधक होते, ज्यांनी मला विरोध केला, पातळी सोडून माझ्यावर टीका केली त्यांच्यावर मी बोलले नाही, कधी कोणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत, खालच्या पातळीवर टीका केली नाही. कुणी काही चुकलं तर त्या व्यक्तीवर बोलायला संधीचा फायदा घेतला नाही. ते आमच्या रक्तातच नाही", असंही त्या आपल्या भाषणात म्हणाल्या. यावेळी त्यांनी प्रत्यक्षरित्या टीका केली नसली तर त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? हा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. 

"कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासात नाव झालेलं नाही. संघार्षाशिवाय नाव होत नाही. माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही. कोणत्याही आगीतून नारळ काढायला घाबरत नाही", असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं. या वक्तव्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Video | "...तर मोदीही मला संपवू शकणार नाहीत," पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

पंकजा मुंडे भाजपा नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेवर उमेदवारी न मिळाल्याने, तर कधी राज्यातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या नाराजीबाबत तर्कवितर्क लावले गेले. “मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाही,” असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये यापूर्वी केलं होतं.