Rss Chief Mohan Bhagwat : देशात समग्र धोरण बनावे आणि त्यातून कुणालाही सूट मिळू नये - भागवत

 Mohan Bhagwat Vijayadashmi speech :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपुरातील रेशमबाग येथे वार्षिक विजयादशमी कार्यक्रमाला संबोधित केले.

Updated: Oct 5, 2022, 11:07 AM IST
Rss Chief Mohan Bhagwat : देशात समग्र धोरण बनावे आणि त्यातून कुणालाही सूट मिळू नये - भागवत  title=

 नागपूर : RSS Dussehra 2022: 50 वर्षांनंतर देशातील किती लोकांचे पोषण होऊ शकेल, शिक्षण, आरोग्य इत्यादी बाबींच्या व्यवस्था काय असतील याचा विचार व्हायला हवा. समग्र विचार करुन धोरण बनवावे लागते. भारतीय सरकारने असे धोरण तयार केले. घरातील मुलांना सामाजिक व्यवहाराचे प्रशिक्षण कुटुंबातून मिळते. संख्या कमी झाली तर त्यात अडचण येते. कुटुंबातून हे शिक्षण मिळते. जर लोकसंख्या कमी झाली तर समाज आणि अनेक भाषा लुप्त होण्याची भिती असते. लोकसंख्येत प्रमाणाचेदेखील संतुलन हवे. असंतुलन झाले की काय होते याचे परिणाम 50 वर्षांअगोदर आपण भोगले. लोकसंख्येत पंथ, संप्रदायाचे प्रमाण असंतुलित झाल्याने देश तुटतो. घुसखोरीतून या गोष्टी होतात. या संतुलनाकडे लक्ष दिले पाहिजे. देशात लोकसंख्येचे समग्र धोरण बनावे आणि त्यातून कुणालाही सूट मिळू नये. सर्वानी त्याचा स्वीकार केला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले. (Rss Chief Mohan Bhagwat Vijayadashmi speech)

 RSS प्रमुख मोहन भागवत यांनी आज नागपुरातील रेशमबाग येथे वार्षिक विजयादशमी कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गिर्यारोहक संतोष यादव उपस्थित होते. आपल्या भाषणात सरसंघचालक म्हणाले, आरएसएसच्या कार्यक्रमांना पाहुणे म्हणून समाजातील महिलांना हजेरी लावण्याची परंपरा जुनी आहे. व्यक्ती बांधणीच्या शाखेचे तत्त्व, युनियन आणि समिती पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्रपणे चालते. इतर सर्व कामांमध्ये स्त्री-पुरुष एकत्र काम करतात. पुरुष मातृत्वाच्या सामर्थ्याची बरोबरी करु शकत नाहीत. लोकसंख्येचा योग्य समतोल असायला हवा, हे ओझे नाही, असेही ते म्हणाले.

'भारत आत्मनिर्भर होत आहे'

भागवत म्हणाले, योगायोगाने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणजे शक्ती आणि चेतनेचे प्रतिनिधित्व करणारे संतोष यादव आहेत. दोनदा त्यांनी गौरी शंकराची उंची ओलांडली आहे. जगात भारताचा दबदबा वाढला आहे. सुरक्षेच्या बाबतीतही आपण अधिकाधिक स्वावलंबी होत आहोत. स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी राष्ट्र म्हणून आपली व्याख्या करणारी मूलभूत तत्त्वे आणि विचार समजून घेणे आवश्यक आहे. आपण महिलांचे सक्षमीकरण केले पाहिजे. महिलांशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. जगात आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाढली आहे. आम्ही श्रीलंकेला ज्या प्रकारे मदत केली आणि युक्रेन-रशिया युद्धादरम्यान आम्ही घेतलेली भूमिका हे दर्शवते की आमचे ऐकले जात आहे. देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.

विदेशी आक्रमणामुळे काही धर्म पंथ देशात बनले. मात्र त्यांचे पूर्वज आपलेच होते. सत्य, करुणा, शुचिता, तप हाच खरा धर्म आहे. पुजापद्धती परिस्थितीनुसार बदलतात. मात्र धर्माची ही चार मूल्ये कायम असतात. यातील एकही मूल्य ढळले तर अधर्म वाढतो. म्हणूनच अस्पृश्यता अधर्म आहे, जाती-पातीवरून विषमता अधर्म आहे. संघ कुणाचाही विरोध करत नाही. हिंदुत्वाला अनेकांचा विरोध असतो, ते वेगवेगळे शब्द वापरतात. मात्र त्यांचा अर्थ एकच आहे. आत्मरक्षेसाठी संघटित व्हायला हवे. आम्ही कुणालाही घाबविणारे नाही. हिंदू समाज उभा करायचा आहे. आम्ही शांतता  व बंधुभावाच्या बाजूने. लोक संघाबाबत तथ्यहीन बाबींचा प्रचार-प्रसार करतात. अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधी अनेक दिवसांपासून संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटत आले आहेत. गोळवलकर गुरुंजींनादेखील अल्पसंख्यांक लोक भेटले होते. संघ हा संवाद भविष्यात आणखी वाढवेल. समाजात द्वेष निर्माण करण्याचा काही तत्त्व प्रयत्न करत आहेत. उदयपूर,अमरावतीमध्ये क्रूर प्रकार घडला व मुस्लिमांनीदेखील त्याचा विरोध केला. अन्यायाविरोधात असेच उभे राहिले पाहिजे. सर्वांनी कायदा, संविधानाच्या मर्यादेत रहायला पाहिजे व त्याचे पालन करायला हवे, असे भागवत म्हणाले.

'लोकांच्या मनात विषमता, ती मनातून निघाली पाहिजे'

सर्वांना स्वस्त व सुलभ उपचार मिळायला हवे. प्लुरोपॅथिक उपचारपद्धती मिळायला हवी. सरकारच्या धोरणामुळे योगासनाची मान्यता वाढत आहे. मात्र लोकांची सवय बदलली आहे का. कचरा कुठे टाकतो, पर्यावरण, परिसर स्वच्छ ठेवतो का या गोष्टींचा विचार करायला हवा. समाजाच्या सहयोगाशिवाय व्यवस्था यशस्वी होत नाही..राजकीय स्वतंत्रतेसोबत सामाजिक स्वतंत्रता आवश्यक असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. नियम, कायदे बनत आहे, मात्र लोकांच्या मनात विषमता असते. ती मनातून निघाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. मंदिर, पाणी, स्मशान सर्वांसाठी एक असावे. लहान गोष्टींवरून वाद व्हायला नको. तर आर्थिक, राजकीय स्वतंत्रता प्रत्येकापर्यंत पोहोचविणाऱ्या सामाजिक स्वतंत्रता होईल. रोजगार आर्थिक स्वतंत्रतेतून निर्माण होतो. रोजगाराभिमुख, शोषणमुक्त अर्थव्यवस्था असली पाहिजे. मात्र त्यासाठी संयम असायला हवा व भोगवादी वृत्तीतून बाहेर पडले पाहिजे. लोकांनी वैभवाचे अनावश्यक प्रदर्शन टाळले पाहिजे. स्वार्थाला मनातून दूर करायला हवे, तर शोषणमुक्त अर्थव्यवस्था हवी. नोकरीच्या मागे पळणे कितपत योग्य आहे याचा विचार हवा. लोकसंख्येच्या तुलनेत नोकऱ्या 20 ते 30 टक्केच असतात. त्यामुळे उद्योजकतेची वृत्ती वाढायला हवी. एक सरकार, एक नेता बदल घडवू शकत नाही. 275 जिल्ह्यांत रोजगार देण्यासंदर्भात स्वयंसेवकांकडून कार्य सुरू झाले आहे. लघुउद्योग, सहकार, कृषी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार. यात समाज सर्वाधिक सहभागी असतात. सरकार जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतात की नाही यावर सर्वांनी लक्ष ठेवले पाहिजे. मात्र समाजानेदेखील पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

आज नवीन बदल होत आहेत. जगात देशाची विश्वसनियता व प्रतिष्ठा वाढली आहे. श्रीलंकेत आपण मदत केली. युक्रेनमध्ये देशाने जी भूमिका घेतली ती जगाने ऐकली. देशाचे वजन वाढत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबत आपण स्वावलंबी होत आहोत. अर्थव्यवस्था आता सुधारत आहे व तिची प्रगती होईल असे अंदाज वर्तविण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रात जगात आपले खेळाडू कर्तुत्व दाखवत आहेत. कर्तव्यपथ आत्मनिर्भर भारत होत आहे. मात्र आपला आत्मा काय आहे याबाबत नेतृत्व, नागरिक व समाजात स्पष्टता हवी. प्रगतीचा मार्ग सऱळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. लवचिकता ठेवावी लागते, असे भागवत म्हणाले.