Nitesh Rane | नितेश राणे यांचा जामीन मिळताच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

संतोष परब प्रकरणात (Santosh Parab) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane Bail) यांना सशर्त जामीन मिळाला.   

Updated: Feb 10, 2022, 04:43 PM IST
Nitesh Rane | नितेश राणे यांचा जामीन मिळताच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

सिंधुदुर्ग : संतोष परब प्रकरणात (Santosh Parab) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane Bail) यांना सशर्त जामीन मिळाला. त्यानंतर आज अखेर 8 दिवसांनी सुटका झाली. सुटकेनंतर नितेश राणे यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thakceray) हल्लाबोल केला. ( bjp mla nitesh rane critisize to chief minister uddhav thackeray at sindhudurga) 

नितेश राणे यांच्या तब्येतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. हा राजकीय आजार असल्याचंही म्हटलं गेलं. यावरुन एखाद्याच्या आजारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ही राज्याची नितिमत्ता आहे का, हे नैतिकतेत बसतं का, असा प्रश्न उपस्थित करच नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला.

नितेश राणे काय म्हणाले?

"हा जो काही एकूण विषय आहे, हा राजकीय आजार आहे, असा माझ्यावर आरोप करण्यात आला. न्यायालयीन कोठडी आहे, म्हणून यांनी हा  राजकीय आजार काढलाय. चला आपण मानूयात नितेश राणे खोटं बोलत होते.  खोटं बोलतोय त्याला तुरुंगात जायचं नाहीये, पण ज्या यंत्राच्या मदतीने माझा रक्तदाब तपासला जायचा, जे माझे रिपोर्ट काढले जायचे, ते ही खोटे होते का?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.    

"आजच मी दुपारी सिंधुदुर्गात रक्तदाब तपासला. 152 इतका होता. मी काय त्या यंत्रात बोट घातलं होतं का की जेणेकरुन खोटी माहिती बाहेर येईल", अशा शब्दात नितेश यांनी संताप व्यक्त केला.   

"कोणाच्याही तब्येतीवर अशा प्रकारे प्रश्न उचलणं हे किती नैतिकतेत बसतं, राज्याच्या संस्कृतीला हे साजेसं आहे का, हा विचार या निमित्ताने करायला हवा. 
मग प्रश्नच विचारायचे असतील, तर आम्हीही खूप विचारु शकतो", असं नारायण राणेंचे सुपुत्र म्हणाले. 

"महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेशा आहे का हा विचार करायला हवा, आम्ही विचारलं तर चालेल का की जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, जेव्हा ईडीच्या कारवाया सुरु होता, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात. आम्ही विचारल तर चालेल का", असा खोचक प्रश्नही भाजप आमदारांनी उपस्थित केला.  

अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री आजारी का पडतात?

"लता दीदींच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात बेल्ट नाही, आणि मग अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री आजारी का पडतात", असां प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला. 

"महाविकास आघाडीचे जे नेतेमंडळी आहेत, त्यांच्यावर जेव्हा ईडीच्या कारवाया सुरु होतात, तेव्हाच त्यांना 14 दिवस कोरोना कसा होतो, हे प्रश्न आम्ही विचारलं चालेला का", असंही नितेश राणे यांनी नमूद केलं. 

"सिंधुदुर्ग आणि मुंबईत उपचार घेणार"

"माझ्या तब्येतीबद्दल जे काही विषय सुरु होते, त्याबाबत मला आश्चर्य वाटतं. मला आजही त्रास होतोय. यानंतरही मी कोल्हापुरातील रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी, मी माझ्या एसएसपीएम मेडिकल हॉस्पीटमध्ये जाणार आहे. तिथे 2 दिवस उपचार घेणार आहे. त्यानंतर मी पुढील उपचारांसाठी मुंबईला जाणार आहे", अशी माहिती नितेश राणेंनी दिली. 

मणक्याचा त्रास

"मला पाठीच्या मणक्याचा त्रास आधीही होता आताही आहे. माझे एमआरआय रिपोर्ट डॉक्टरांनी पाहिले. तो त्रास आता वाढलेला आहे. रक्त दाबाचा त्रास आहे. मला शुगर लो होतेय", असं नितेश राणेंनी नमूद केलं.