भाजपचं शिवसेनेला जशास तसं उत्तर, मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन तक्रार दाखल करण्यात आली आहे

Updated: Aug 25, 2021, 07:05 PM IST
भाजपचं शिवसेनेला जशास तसं उत्तर, मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल title=

यवतमाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याविरोधात केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर राणे यांना झालेली अटक यामुळे शिवसेना-भाजप आमने सामने आले आहेत. शिवसैनिकांनी राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. आता भाजपनेही शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे.

भाजपने मुख्यमंत्र्यांविरोधात यवतमाळ आणि नाशिकमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजपने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वेगवेगळ्या 5 पोलीस ठाण्यात भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत. 

तर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले यांनी आज तक्रार अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

युवा सेनेचे वरूण सरदेसाई यांना तोडफोड केल्याबद्दल शाबासकी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत, संजय राऊत यांच्या लेखामधील उल्लेख आणि त्यांचे होर्डिंग लावून सामाजिक शांतता धोक्यात आणल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपशब्द काढल्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

शिवरायाला राज्याभिषेक करताना उत्तर प्रदेशमधून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायांना राज्याभिषेक केला होता आणि हा जो योगी आला. अशी टरटरुन, कसलं काय नसलं की, म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतो, गॅस असतो पण हवेत उडत असतो. तसा हा गॅसचा फुगा आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला. असं वाटलं त्याचं चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाडं फोडावं. लायकी तरी आहे का तुझी? महाराजांच्या पुतळ्याच्या समोर राहण्याची,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.