शहापूर : शहापूर तालुक्यात सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातसई गावाजवळील पूल खचलाय. त्यामुळे प्रशासनाने हा पूल दळणवळणासाठी बंद केलाय. त्यामुळे आता वासिंद परिसरतील ५० गावांचा संपर्क तुटला आहे.
वसिंदच्या भातसई गावाजवळील भातसा नदीवरील पूल गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री एका बाजूस तीस फूट खचलाय. गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली होती. पण हे ऑडिट होण्यापूर्वीच हा पूल खचलाय.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलाची दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहन चालक घाबरत घाबरत हा पूल ओलांडत होते. मात्र, अचानक पुलाची एक बाजू ३० फूट ढासळली. सुदैवाने यावी पुलावर एकही वाहन नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
पूल खचल्याची माहिती मिळाल्यानंतर सार्वजिक बांधकाम शहापूर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या पुलवारील वाहतूक तातडीने बंद केली आहे.
वारंवार तक्रारी करूनही या पुलाकडे सार्वजिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तरी तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी अथवा नवा पूल उभारावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.