एकेकाळच्या सैन्य अधिकाऱ्याची फुटपाथवर हत्या!

कधीकाळी सैन्य दलात अधिकारी राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा पुण्यात करुण अंत झाला.

Updated: Feb 3, 2018, 11:33 PM IST
एकेकाळच्या सैन्य अधिकाऱ्याची फुटपाथवर हत्या! title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : कधीकाळी सैन्य दलात अधिकारी राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा पुण्यात करुण अंत झाला.

पुण्याच्या लष्कर भागातील बानो कोयाजी रोडवरील फूटपाथ हा निवृत्त कॅप्टन रवींद्रकुमार बाली यांचा गेल्या तीनेक वर्षांपासूनचा पत्ता होता. सदर्न कमांड ऑफिसर्स मेसच्या गेटसमोर त्यांची प्लास्टिक शेडवजा झोपडी होती. याच ठिकाणी कॅप्टन बालींचा करुण अंत झालाय.

कुणी केली हत्या?

गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास मोटार सायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांना आधी मारहाण केली आणि डोक्यात सिमेंटची वीट घालून पळ काढला. 

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू होणं दुर्दैवी म्हणावं लागेल. मात्र घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, असं त्यांच्या आयुष्यात घडलं.

नशिबानं दिलेले धक्के

राजस्थानातील कोटा इथं कॅप्टन बाली यांचा जन्म झाला होता. १९७० साली पुण्याच्या एनडीएमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. इथलं खडतर प्रशिक्षण घेऊन ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले. 

मात्र, घरी भावंडांकडून आई-वडिलांची आबाळ होत असल्याचे समजल्यावर त्यांनी सैन्य दलातील नोकरीचा राजीनामा दिला. लष्करात २० वर्षे पूर्ण झाली नसल्याने त्यांना निवृत्ती वेतन किंवा कुठल्याही सुविधा मिळाल्या नाहीत. 

आई-वडिलांच्या निधनानंतर कॅप्टन बालींचा जगण्याचा संघर्ष सुरु झाला. मात्र त्यात कुठेच कायमस्वरुपी काम किंवा घर मिळू शकलेले नाही. नशिबाचे धक्के खात ते या फूटपाथपर्यंत पोहचले आणि इथंच त्यांचा करुण अंत झाला.