तरुणांनी तलवारीने कापला 'केक', पोलिसांनी दिली कोठडीची 'भेट'

आजकाल बंदूक, तलवार किंवा अन्य शस्त्र हातात घेऊन फोटो काढले जातात. हे फोटो सोशल मिडियावर टाकत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो

Updated: Jul 15, 2021, 07:28 PM IST
तरुणांनी तलवारीने कापला 'केक', पोलिसांनी दिली कोठडीची 'भेट' title=

उल्हासनगर : तलवारीने केक कापत थाटात वाढदिवस साजरा करणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. आजकाल बंदूक, तलवार किंवा अन्य शस्त्र हातात घेऊन फोटो काढले जातात. हे फोटो सोशल मिडियावर टाकत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशीच काहीशी घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. 

तरुणांनी तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात केक कापणाऱ्या दोन तरुणांना बेड्या ठोकत त्यांना वाढदिवसाची 'भेट' दिली.

उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील आझाद नगर परिसरात राहणाऱ्या समीर शेख याचा बुधवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने बुधवारी रात्री तरुणांच्या गर्दीत आझाद नगर परिसरात बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी समीर शेख आणि फौजी लबाना या दोघांनी तलवारीने केक कापला. याचा व्हिडीओ त्यांच्याच सोबतच्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आणि तो व्हायरल झाला. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेत शोधाशोध सुरू केली. काही तासातच समीर शेख आणि फौजी लबाना या दोघांनाही उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार आणि एक छोटा चाकू हस्तगत करण्यात आला आहे. अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी उन्माद घालत शस्त्रांचा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर जमावबंदी, पॅन्डेमिक ऍक्ट यासह हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी या तरुणांना पोलिसांनी कोठडीची भेट दिली असून त्यांच्यासोबत असलेल्या इतर 5 ते 6 तरुणांचा शोध सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे.