चंद्रपुरात मुलीच्या पिता-भावाकडून प्रियकराची निर्घृण हत्या

योगेश जाधव १२ मेपासून अचानक बेपत्ता झाला... त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याचा शोध घेत होते

Updated: May 14, 2019, 02:17 PM IST
चंद्रपुरात मुलीच्या पिता-भावाकडून प्रियकराची निर्घृण हत्या title=

चंद्रपूर : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात खोट्या प्रतिष्ठेपायी हत्येच्या (ऑनर किलिंग) अनेक घटना उघड होत आहेत. याच साखळीत चंद्रपुरातही एक ऑनर किलिंगची घटना उघडकीस आलीय. चंद्रपुरातील घुग्गुस परिसरातून ही घटना समोर येतेय. मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज असलेल्या पिता आणि भावानंच तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालंय. योगेश जाधव असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. 

ट्रॅक्टर मालक असलेल्या प्रभूदास धुर्वे यांच्या मुलीशी २३ वर्षांच्या योगेश जाधव याचे प्रेमसंबंध सुरू होते. यामुळे धुर्वे आणि त्यांचा मुलगा नाराज होते. त्यातच योगेश जाधव १२ मेपासून अचानक बेपत्ता झाला. त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याचा शोध घेत होते. पोलीस चौकशी सुरू असतानाच धुर्वे पिता-पुत्रानं पोलिसांसमोर शरणागती पत्करली. 

आपणच योगेशची हत्या केल्याची कबुली प्रभूदास धुर्वे आणि पुत्र कृष्णा धुर्वे यांनी दिली. निलजई खाण परिसरातील जंगलात योगेशचा मृतदेह फेकल्याचीही कबुली त्यांनी दिली. 

त्यानंतर पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील निलजई खाण परिसरातून योगेश जाधव याचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणात सिरपूर आणि घुग्गुस पोलीस अधिक तपास करत आहेत.