औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले या सभेला संबोधित करत होते. त्यावेळी श्रोत्यांमधील एका व्यक्तीने आक्षेपार्ह विधान केले. सुरुवातीला काही जणांनी घोषणाबाजी केली. यानंतर दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. यामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. तसेच तुरळक दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्यानंतर या सभेला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
गेल्यावर्षीही नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात आठवले यांना भाषणादरम्यान विरोधाचा सामना करावा लागला होता. नामांतराच्या या चळवळीत रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. दरवर्षी नामविस्तार दिन सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक संघटनेचा स्वतंत्र मंच उभारण्यात येतो. मात्र, गेल्यावर्षीपासून दलित संघटनांनी एकाच मंचावरून सोहळा पार पाडण्याचा ठराव मंजूर केला होता.
काही दिवसांपूर्वीच अंबरनाथ येथील सभेत रामदास आठवले यांना प्रवीण गोसावी नावाच्या व्यक्तीने कानशिलात लगावली होती. रामदास आठवले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रामदास आठवले यांनी भाषणही केले. यानंतर ते स्टेजवरून उतरून गाडीकडे चालत जात असताना प्रविण गोसावी या तरुणाने त्यांच्या कानशिलात लगावली. तेव्हा आजुबाजूच्या कार्यकर्त्यांना लगेचच या व्यक्तीला पकडून चोप दिला होता. या प्रकारानंतर रामदास आठवले यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली होती.