अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक लाईव्हचा पुरेपूर आणि उत्तमप्रकारे वापर केला होता. यानंतर आता उद्धव ठाकरे हे इन्स्टाग्रामवरही एक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची पोस्ट पाहिल्यानंतर शनिवारी पुरातत्त्व खात्याला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना या गोष्टीचा पाठपुरावा करावा, असे बजावले आहे.
उद्धव ठाकरे यांचा छायाचित्रकार म्हणून असलेला लौकिक सर्वश्रुत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी एक्टिव्ह असतात. या माध्यमातूनच उद्धव ठाकरे यांना आज इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्गाच्या एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले. या पोस्टची तत्काळ दखल घेत त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती कळविण्याचे तसेच पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे दुर्गप्रेमींकडून कौतुक होत आहे.
इन्स्टाग्रामवर विजयदुर्गच्या पडझडीची दखल घेण्यापासून ते त्याबाबत प्रशासनाला सतर्क करून, थेट भारतीय पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या प्रय़त्नामुळे निश्चित विजयदुर्गच्या या बुरूजाची पडझड रोखणे शक्य होणार आहे. तसेच या जलदुर्गाच्या देखभालीचा मार्गही आणखी सुकर होणार आहे. गडकोट किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ते जतन करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक संवेदनशील दुर्गप्रेमी आणि शोधक छायाचित्रकाराच्या नजरेने पुढाकार घेण्यामुळे दुर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.