राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, मुंबईने ओलांडला १ लाखांचा टप्पा

महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.

Updated: Jul 18, 2020, 10:15 PM IST
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, मुंबईने ओलांडला १ लाखांचा टप्पा title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. लागोपाठ तीन दिवस राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांपेक्षा जास्तने वाढली आहे. एका दिवसात राज्यात कोरोनाचे ८,३४८ रुग्ण वाढले आहेत, तर १४४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ३५० वर पोहोचली आहे, यातले ऍक्टिव्ह रुग्ण २३,९१७ आहेत. 

सलग तिसऱ्या दिवशी पुण्यामध्ये मुंबईपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. पुण्यात आज १५८९ तर मुंबईत ११८६ रूग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ११,५९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी एकट्या मुंबईत ५,६५० मृत्यू आहेत. सध्या राज्यातला मृत्यूदर ३.८५ टक्के एवढा आहे. 

महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांचा एकूण आकड्यानेही ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाचे ३,००,९३७ रुग्ण सापडले. यातले १,२३,३७७ रुग्ण हे सध्या ऍक्टिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत १,६५,६६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात ५,३०६ रुग्ण बरे झाल्यामुळे घरी गेले आहेत. यामुळे राज्यातला बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ५५.०५ टक्के एवढा झाला आहे.